कोल्हापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप मुंडरगी यांचे निधन 

राजेश मोरे 
Thursday, 7 January 2021

जुन्या काळातील फौजदारी वकील प्रफुल्लचंद मुंडरगी यांचे ते चिरंजीव होत

कोल्हापूर - कोल्हापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप ऊर्फ नाना प्रफुल्लचंद मुंडरगी (वय 60) यांचे आज अल्पशना आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. 

जुन्या काळातील फौजदारी वकील प्रफुल्लचंद मुंडरगी यांचे ते चिरंजीव होत. त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. गेली 35 वर्षे ते कोल्हापुरात वकीली क्षेत्रात काम करत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे या आंदोलनातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांचा नाट्य व सिनेक्षेत्राशीही जवळचा संबध होता. त्यांनी स्वतः अनेक नाटकात भूमिका केल्या आहेत. ते श्री महालक्ष्मी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक होते.

हे पण वाचा - कोल्हापूर : पोलिस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

 

गेली अनेक वर्षे ते महालक्ष्मी बॅंक परिवाराशी परिचित होते. त्यांच्या ज्ञानाचा बॅंकेच्या कामकाजात नेहमीच उपयोग होत होता. त्यांच्या निधनाने जिल्हा न्यायालयात तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. फौजदारी क्षेत्रात मुंबई उच्च न्यायालयात वकीली करणारे अशोक मुंडरगी यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal lawyer Dilip Mundergi passes away kolhapur