प्रशासनाने सरसकट नुकसान भरपाईसाठी सहकार्य करावे ; खासदार धैर्यशील माने

अमर पाटील 
Saturday, 17 October 2020

शाहुवाडी, पन्हाळा व शिराळा तालुक्याच्या पिक नुकसानीच्या पाहणी दौऱ्या प्रसंगी ते बोलत होते

बांबवडे - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुका प्रशासनाने शेतकऱ्यांशी योग्य समन्वय ठेऊन त्यांना सरसकट नुकसान भरपाईसाठी सहकार्य करावे अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या.

शाहुवाडी, पन्हाळा व शिराळा तालुक्याच्या पिक नुकसानीच्या पाहणी दौऱ्या प्रसंगी ते बोलत होते. माने यांनी आज सकाळी खुटाळवाडी, साळशी, सुपात्रे, सोनवडेसह शाहुवाडी तालुक्यातील महत्वाच्या गावांची पाहणी केली. 

यावेळी ते म्हणाले, शासनाने ५० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी असा आदेश दिला आहे. परंतु ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी योग्यप्रकारे काम करुन अहवाल दोन दिवसांत शासनाला सादर करावेत.  

शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिक पावासामुळे शेतात कुजत आहे. तर अशा शेतऱ्यांनी त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करुन उरलेसुरले पिक काढून घ्यावे. अशा शेतकऱ्यांनाही फोटो व व्हिडिओच्या सहाय्याने नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले. 

अ. भा. ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अमर पाटील यांनी मागील महापुराची भरपाई अजूनही काही लोकांना मिळाली नाही, त्याविषयी तालुका प्रशासनाला सूचना कराव्यात अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांना केली.

हे पण वाचाप्रसंगी कर्ज काढून बळीराजाला मदत करू ; ग्रामविकास मंत्री

यावेळी जि.प. सदस्य विजय बोरगे, सभापती सुनिता पारळे, संदीप पाटील, सुरेश पारळे, अशोक पाटील, नामदेव गिरी, सुंदर पाटील, भेडसगावचे सरपंच अमर पाटील, ग्राहक पंचायतीचे ता. अध्यक्ष अमर पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिजित धेडे, नायब तहसीलदार विलास कोळी, मंडल अधिकारी अतुल नलवडे, ग्रामसेवक नसीर मुलानी, पं. समिती सहाय्यक संदीप कोटकर, मंडल अधिकारी नितीन रणदिवे, मंडळ अधिकारी, अभिषेक सापते, कृषी पर्यवेक्षक ए. के. पाटील, सहाय्यक एस. बी. राबाडे, तृप्ती पाटील आदी उपस्थित होते.

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crop damage inspection tour on mp dhairyasheel mane