लक्ष्मी पूजनाच्या साहित्य खरेदीस गर्दी

 Literary cars crowd of Lakshmi worship
Literary cars crowd of Lakshmi worship

कोल्हापूर : दीपावलीच्या उत्सवाला प्रारंभ झाला असून श्री लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त उद्या (शनिवारी) आहे. यानिमित्त आज शहरातील महाद्वार रोड, कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी, शिवाजी उद्यमनगर समोरील श्रीकृष्ण मंदिरासमोर, गंगावेस, बिनखांबी गणेश मंदिर, श्री अंबाबाई मंदिर परिसरात, माळकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, पापाची तिकटी, महापालिकेसमोर आज बाजरपेठ फुलून आली होती. श्री लक्ष्मी पूजनासाठी लागणारी झेंडू, फुले, कमळ, केळीचे मोने, श्री लक्ष्मी-कुबेर पूजनासाठी लागणारी यंत्रे, केवडा, फुलवाती, पवते, सत्यनारायण पुडा, हळद-कुंकवाचा करंडा आदी साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. 
उद्या (शनिवारी) नरक चतुर्दशी असून सकाळी अभ्यंगस्थानाने दीपावलीला सुरवात होईल. पूजेसाठी कोहळ्याचा मान असतो. हा कोहळा 100 ते 150 रुपये किलोने विक्री झाला. पाच फळांची प्लेट ही 50 ते 60 रुपये होती. यामध्ये पेरू, चिक्कू, केळी, संत्री, मोसंबी, सफरचंद आदींचा समावेश होता. सकाळी सहापासून ते रात्री साडेनऊपर्यंत फुलांची, अन्य पूजेच्या साहित्यांची विक्री सुरू होती. फुलांबरोबर उदबत्त्या, धूप, अत्तराचा फायाही अनेकांनी घेतला. पूजेसाठी लागणारे तांब्याचे कलश, खरेदीसाठी भांड्याच्या दुकानातही गर्दी झाली होती. याबरोबर अन्य देवतांमध्ये श्री लक्ष्मी-विष्णू, गणपती, अन्नपूर्णाच्या मूर्तीचीही विक्री झाली. 
दरम्यान, झेंडू घेण्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. सोशल डिस्टन्सिंग न पाळता, मास्क न वापरता नागरिक फिरताना दिसत होती. कुठेही रस्त्याकडेला उभे राहून झेंडू, फुलांची विक्री सुरू असल्यामुळे जागोजागी ट्रॅफिकही जाम झाले होते. लहान मुले, स्त्रीया, ज्येष्ठ नागरिकही खरेदीसाठी आले होते. 

लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त 
श्री लक्ष्मी-कुबेर पूजनाचा मुहूर्त सायंकाळी पाच वाजून 58 मिनिटे ते रात्री आठ वाजून 32 मिनिटांपर्यंत आहे. यासाठी श्री लक्ष्मी पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य घेण्यासाठी दिवसभर गर्दी झाली. पूजेसाठी लागणारा झेंडू आज 200 रुपये किलोने विक्री झाली; तर केळीचे मोने, आंब्याची पाने (आंबेरी), अन्य फुलांचे दर ही जास्त होते. केळीचे मोने जोडी 40/50 रुपये होती. 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com