esakal | सकाळ वर्धापनदिन : समाजहिताचे प्रश्‍न ‘सकाळ’मुळेच मार्गी ; पालकमंत्री सतेज पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

daily sakal 40 anniversary Honoring Corona Warriors in kolhapur

 ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार

सकाळ वर्धापनदिन : समाजहिताचे प्रश्‍न ‘सकाळ’मुळेच मार्गी ; पालकमंत्री सतेज पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : चुकीच्या गोष्टींवर प्रहार करत असतानाच चांगल्या गोष्टीमागे ‘सकाळ’ ठामपणे उभा राहतो. सातत्याने जागल्याची भूमिका बजावत बातम्यांच्या पलीकडे जाऊन समाजहिताचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या भूमिकेमुळे ‘सकाळ’चे कोल्हापुरातील मातीशी, इथल्या लोकांशी ऋणानुबंध घट्ट आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले.  

‘सकाळ’च्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते महापालिकेचे आरोग्य कर्मचारी प्रवीण लोंढे, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मदने, ‘सीपीआर’मधील स्वच्छता कर्मचारी अमोल इसापुरे, ‘सीपीआर’मध्ये आयसीयू युनिट उभारणारी व कोरोनाने मयत रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारी बैतुलमाल कमिटी व थॅलेसेमिया रुग्णांना औषधे व इतर मदतीसाठी तत्पर फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार झाला. महापौर निलोफर आजरेकर अध्यक्षस्थानी होत्या. शिवाजी उद्यमनगरातील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयातील सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करीत कार्यक्रम झाला. 


श्री. पाटील म्हणाले, ‘‘रंकाळा व पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी व्हावे, यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला. समाजाचे देणे लागतो, ही भूमिका या वृत्तपत्राची आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्‍टरांशी संवाद साधून नागरिकांना धीर देण्याचे काम वृत्तपत्राने केले आहे. केवळ बातम्या देऊन नागरिकांपर्यंत माहिती पोचवणे, जाहिरातीतून आर्थिक कमाई करण्याचा दृष्टिकोन या वृत्तपत्राचा नाही. ‘सकाळ’ कोल्हापुरात सुरू झाला तो रुजला आणि बहरला ही. ४० वर्षे वाचकांशी जोडलेली नाळ अद्याप कायम आहे. सतत जागल्याची भूमिका सकाळ बजावत आहे.’’ 

हेही वाचा- देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ -


ते म्हणाले, ‘‘महापूर व दुष्काळापेक्षा कोरोनाचे संकट महाभयंकर आहे. या जागतिक संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक घटकाच्या हातात हात घालून काम केले जात आहे. जिल्हा प्रशासन रुग्णांना अधिकाधिक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. संक्रमणाचा दोष कोणावर देता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कोरोनाच्या काळातील मृत्युदर पाहता ७० टक्‍क्‍यांहून अधिक मृत्यू पूर्व आजार असलेल्या रुग्णांचे झाले आहेत. चंदगडसारख्या दुर्गम भागात जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलिस यंत्रणा, आशा वर्कर्स, डॉक्‍टर्स, नर्सेस कोरोनाला थोपविण्यासाठी जीव धोक्‍यात घालून कार्यरत आहेत.’’

हेही वाचा- ब्रेकिंग -  कोल्हापूरमध्ये कोरोनाचा कहरच ; आणखी २४२ जणांना कोरोनाची बाधा... -


विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके म्हणाले, ‘‘समाजात बदल घडविण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांची जोड देऊन नेतृत्व घडविले जात आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्याचे काम वृत्तपत्रातून होत आहे. सकारात्मक विचारांची पेरणी करण्याची आवश्‍यकता वृत्तपत्राने ओळखून त्यावर भर दिला आहे. पालकमंत्री पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे पोलिस यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहे.’’ 


सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार म्हणाले,

‘‘समाजाच्या भल्याची भूमिका ‘सकाळ’ मांडत राहिला आहे. कोरोनामुळे समाजासमोर अनेक संकटे उभी असताना त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यम म्हणून जे शक्‍य आहे, ते करण्यात यापुढेही भर राहील. येत्या काळात शिक्षण, आरोग्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाईल. समाज घटकांना नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल.’’ ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी आभार मानले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर उपस्थित होते. 

हेही वाचा- कोल्हापूरमध्ये आता एका आठवड्यात होणार पाच हजारांवर स्वॅबची तपासणी -


‘सकाळ’मुळे समाजाला दिशा ः महापौर
‘सकाळ’ वृत्तपत्र वाचनीय आहे. कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रांसह अन्य घटकांतील बातम्या समाजाला दिशा देणाऱ्या असतात, असे सांगत महापौर निलोफर आजरेकर यांनी कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

संपादन - अर्चना बनगे