अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १९ व्या ऊस परिषदेची तारीख जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

राज्य सरकारमधील मंत्र्यानीच १ नोव्हेंबर नंतर राज्यातील लाॅकडाऊन शिथील करणार असल्याचे सुतोवाच केले आहे

जयसिंगपूर - कोरोनामुळे लांबलेली स्वाभीमानी शेतकरी संघटनेची चालू वर्षाची १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. 

यंदाचा गळीत हंगाम जाहीर झाला आहे. या पार्श्वभुमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, साखर कारखांनदारांनी शेतकऱ्यांना आव्हान देत दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने शेतकऱ्यांना आता रस्त्यावरची आणि कायदेशीर अशी दोन्ही लढाई लढावी लागणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी  संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन केले. 

सध्या सरकारने सिनेमाग्रह , हाॅटेल , रेस्टाॅंरंट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यानीच १ नोव्हेंबर नंतर राज्यातील लाॅकडाऊन शिथील करणार असल्याचे सुतोवाच केले आहे. याच पार्श्वभुमीवर आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून गेली १८ वर्षे ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत ऊसदर ठरत असल्याने सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. 
राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे व १९ वी उस परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केले. 

हे पण वाचाचंदक्रांत दादांच्या मंत्रीपदाचा फायदा नाहीच

     
यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, स्वाभिनानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वैभव कांबळे, आण्णासो चौगुले , आदिनाथ हेमगीरे , मिलींद साखरपे,अजित पोवार , यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Date of 19th Sugarcane Conference of Swabhimani Shetkari Sanghatana announced