
काही दिवसांपूर्वी शाहू स्मृती उद्यानासमोरील रंकाळा तलावात दोन पाणबदकांचा मृत्यू झाला होता
कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या पिछाडीस असलेल्या खाणीत पुन्हा एकदा बदकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांनी सायंकाळी मृत बदक ताब्यात घेतले.
इराणीखाणी लगत अन्य दोन नैसर्गिक खाणी आहेत. पत्तौडी खाण तसेच खणविहार मित्र मंडळाची खाण आहे. परिसरात बदकांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सकाळी फिरायला येणारे लोक बदकांना खाद्यपदार्थ टाकतात. अनेक वर्षांपासून बदके रंकाळा परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. आज सायंकाळी आदित्य होरड यांना तलावात बदक मृत झाल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ पालिकेशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी बदकाला ताब्यात घेतले.
काही दिवसांपूर्वी शाहू स्मृती उद्यानासमोरील रंकाळा तलावात दोन पाणबदकांचा मृत्यू झाला होता. लगतच्या सरनाईक कॉलनीत कबुतराचा मृत्यू झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत रंकाळा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून जाहीर केले होते. तसेच मृत बदके औंध येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यांचा मृत्यू कुरकुरे व चिप्स खाल्ल्याने झाल्याचा अहवाल आला होता.
हे पण वाचा - शरद पवार यांच्या हस्ते उद्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण
थंडीमुळे स्थलांतरीत पक्षी मोठ्या प्रमाणावर रंकाळा तलावावर दाखल झाले आहेत. बर्ड फल्यूच्या धास्तीमुळे पक्ष्यांच्या जवळ जाण्यास कोणी तयार होत नसल्याची स्थिती आहे. त्यात आज बदकाचा मृत्यू झाल्याने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे