
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार उद्या शुक्रवारी (ता.22) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा परिषद प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण, जिल्हा परिषद इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बांधकामाची कोनशिला तसेच ऍम्ब्युलन्स प्रदानाचा कार्यक्रम खा.पवार यांच्या हस्ते होणार आहे. पुतळा अनावरण व कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेत शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. तर ऍम्ब्युलन्स प्रदानाचा कार्यक्रम पोलीस ग्राउंडवर होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.
शुक्रवारी (ता.22) सकाळी दहा वाजता श्री. पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारलेल्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्याचा दहा कोटी रुपये खर्चाच्या बांधकामाचा कोनशिला समारंभ होणार आहे. त्यानंतर पोलिस परेड ग्राउंडवर आरोग्य विभागाच्या 39 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा व दिव्यांगांना सानुग्रह अनुदान वाटपाचा कार्यक्रम खा.पवार यांच्या हस्ते होणार आहे. या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत.
या कार्यक्रमास पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजयसिंह मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे पण वाचा - शासकीय रूग्णालय दिवसात दोन वेळा सुरू रहाणार
ना.मुश्रीफांकडून सतत आढावा
गेली पंधरा दिवस जिल्हा परिषदेतील विविध कार्यक्रमांचे नियोजन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यशंवतराव चव्हाण पुतळा परिसर सुशोभिकरण, कोनशिला, त्याठिकाणी जाणारा मार्ग, जिल्हा परिषदेकडे येणारे रस्ते, पोलीस ग्राउंडवरील कार्यक्रम या सर्व ठिकाणी सतत भेटी देवून, या कार्यक्रमात काही त्रुटी राहू नयेत यासाठी ते अधिकाऱ्यांना सुचना देत आहेत.
संपादन - धनाजी सुर्वे