राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; संभाजीराजे छत्रपती 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील दहा हजार कोटींच्या पॅकेजवर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर - : राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील दहा हजार कोटींच्या पॅकेजवर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. 

संभाजीराजे म्हणाले, ""परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर प्रामुख्याने मराठवाड्यात दौरा केला. शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांची हेक्‍टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. तेलंगणाने हेक्‍टरी दहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली आहे. त्यांची काळी दिवाळी होऊ नये, हा त्यांचा प्रयत्न नाही. त्या धर्तीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली होती.'' 

ते म्हणाले, ""कोल्हापूर, सांगलीत महापुराने थैमान घातल्यावर दोन हजार 800 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्या वेळी केंद्र सरकारच्या पथकाने येथे येऊन पाहणी केली. केंद्र सरकार 900 कोटी रुपये देण्यास तयार होते. मात्र, राज्य शासनाकडून अर्ज पाठविण्यात न आल्याने ते मिळाले नाहीत. ही चूक आता पुन्हा होऊ नये, असे वाटते. त्यामुळे राज्य शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारला सात दिवसांत पथक पाठवावे लागेल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.'' 

हे पण वाचाआयपीएल बेटींग प्रकरणी आणखी एकाला अटक ; रॅकेटची शक्‍यता

 

प्रत्यक्ष पाहणी महत्त्वाची 
छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असल्याने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच मी परतीच्या पावसाने दणका दिल्यावर शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या व्यथा समजून 
घेतल्या, असेही संभाजीराजे यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Declare a wet drought in the state Sambhaji Raje Chhatrapati