आजरा तालुक्‍यातील सेंद्रिय भाजी मिळणार कोकणातील 'या' गावांत

रणजित कालेकर
मंगळवार, 30 जून 2020

गेली तीन वर्षांपासून झुलपेवाडी येथे चिकोत्रा सेंद्रिय शेतीमाल उत्पादक गट कार्यरत आहे. सुमारे पन्नास एकरांवर 36 शेतकरी सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत.

आजरा : आजरा तालुक्‍यातील सेंद्रिय भाजीपाल्याला कोकणातून मागणी येत आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरच्या बाजारपेठेत पोहोचलेला भाजीपाला लवकरच कोकणातही जाणार आहे. झुलपेवाडी येथील चिकोत्रा सेंद्रिय शेतीमाल उत्पादक गटाने यासाठी पुढाकार घेतला असून सावंतवाडी व ओरस येथील बाजारपेठेत याची आठवडाभरात विक्री सुरू होणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडून (आत्मा) प्रोत्साहन मिळत आहे. 

गेली तीन वर्षांपासून झुलपेवाडी येथे चिकोत्रा सेंद्रिय शेतीमाल उत्पादक गट कार्यरत आहे. सुमारे पन्नास एकरांवर 36 शेतकरी सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. हा गट कोथिंबीर, पालेभाज्या, वांगी, टोमॅटो, मिरची, कांदा, भेंडी, गवार, दोडका, कारली, बिन्स, घेवडा, पालक, मेथी, पोकळा, दुधी भोपळा याचे उत्पादन घेतो. दर्जेदार भाजीपाला असल्याने ग्राहकांकडून याला मोठी मागणी आहे. आठवड्याला सुमारे पाच टन भाजीपाल्याची विक्री होते.

गडहिंग्लज, उत्तूर व आजरा परिसरातील काही गावांत याची विक्री होत असून चार-पाच महिन्यांपासून सांगली, कोल्हापूर, तासगाव येथील बाजारपेठेत याची विक्री होत आहे. बाजारपेठेतील अन्य भाजीपाल्यापेक्षा सेंद्रिय भाजीपाल्याची सव्वा पट दराने विक्री केली जात असल्याचे सेंद्रिय गटाचे अध्यक्ष उद्धव माने यांनी सांगितले. कोकणातून सेंद्रिय भाजीपाल्याला मागणी केली असून सावंतवाडी, ओरस येथे आठवडाभरात भाजीपाला विक्रीसाठी पाठवला जाणार असून गटाकडून याचे नियोजन केले जात आहे. 

कोल्हापुरी खजिना... 
आजरा तालुक्‍याबरोबर जिल्ह्यातील जे शेतकरी सेंद्रिय उत्पादन घेतात. त्यांच्याशी संपर्क करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी उत्पादित केलेली सेंद्रिय उत्पादने "कोल्हापुरी खजिना' या ब्रॅण्डखाली विक्री करण्याचा विचार चालू आहे. पुणे, मुंबई या मोठ्या बाजारपेठेत या उत्पादनांची विक्री करणार असल्याचे उद्धव माने यांनी सांगितले. 

ऑनलाईन बैठकीत विचारविनिमय 
सेंद्रिय उत्पादनासंदर्भात शेतकऱ्यांच्या आत्मांतर्गत नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत आठवडी बाजारात सेंद्रिय उत्पादनासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, सेंद्रिय उत्पादनासाठी जिल्हास्तरावर ऍग्रो कंपनीची स्थापना करावी, कृषी विभागाने सेंद्रिय प्रमाणपत्र व आवश्‍यक कागदपत्रांसाठी पाठपुरावा करावा; पुणे, मुंबई बाजारपेठेत माल विक्रीसाठी प्रयत्न करावेत, याबाबत विचारविनिमय झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Ajara's Organic Vegetables In Konkan Kolhapur Marathi News