बेळगाव- सावंतवाडी रेल्वे प्रस्ताव मार्गी लावा, 'या' आमदारांनी केली रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांच्याकडे मागणी

सुनील कोंडुसकर
Monday, 27 July 2020

कर्नाटकचा बेळगाव परिसर आणि कोकण विभागाला जोडणाऱ्या या मार्गामुळे शेती व औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. जून्या रामघाट मार्गे हा रेल्वे मार्ग तयार केला जाणार होता.

चंदगड : बेळगाव- सावंतवाडी या सर्वेक्षण झालेल्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव अनेक वर्षापासून रेल्वे मंत्रालयात रखडला आहे. हा प्रश्‍न त्वरीत मार्गी लावावा, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे केली. बेळगाव येथील निवासस्थानी आमदार पाटील यांनी भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. 

कर्नाटकचा बेळगाव परिसर आणि कोकण विभागाला जोडणाऱ्या या मार्गामुळे शेती व औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. जून्या रामघाट मार्गे हा रेल्वे मार्ग तयार केला जाणार होता. अलिकडच्या काळात त्याचे फेर सर्वेक्षणही झाले आहे. मात्र तो रेल्वे मंत्रालयात रखडला आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज हा परिसर अनेक वर्षापासून रेल्वे मार्गापासून वंचित आहे.

या मार्गामुळे हा भाग रेल्वेशी जोडला जाणार आहे. दरम्यान कोल्हापूर, निपाणी, संकेश्‍वर, बेळगाव, धारवाड, हुबळी या रेल्वे मार्गासाठी तत्कालीन खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी प्रयत्न केले होते. हा मार्ग सुध्दा कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. मंत्री अंगडी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Complete The Belgaum-Sawantwadi Railway Proposal Kolhapur Marathi News