पाईपलाईनची गळती शोधणार डिटेक्‍टर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

पाईपलाईनची गळती काढण्यासाठी महापालिका आता पाईप डिटेक्‍टरचा वापर करणार आहे. यासाठी 10 लाईन डिटेक्‍टर पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. प्रत्येकी अडीच लाख किमतीचे हे डिटेक्‍टर आहेत.

कोल्हापूर  : पाईपलाईनची गळती काढण्यासाठी महापालिका आता पाईप डिटेक्‍टरचा वापर करणार आहे. यासाठी 10 लाईन डिटेक्‍टर पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. प्रत्येकी अडीच लाख किमतीचे हे डिटेक्‍टर आहेत.
पाईपलाईनला गळती लागली म्हटली, की लावला जेसीबी आणि काढला खड्डा, असे चित्र नजरेस पडायचे. यात चांगला रस्ता तर खराब व्हायचा, पण गळती काढेपर्यंत महापालिका पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या जीवात जीव नसायचा. गळती कधी निघणार? यासाठी नगरसेवकांचा दबाव, लोकांचा दबाव यातून शाद्बिक वाद व्हायचेत. शिंगणापूर योजनेची गळती काढून पाणीपुरवठा विभाग घाईला आला. आपटेनगरकडून पुईखडी जाणारा रस्ता, चिव्याचा बाजार, बुद्धिहाळकरनगर, साळोखेनगर, आयटीआय, निर्माण चौक येथे सातत्याने गळती निर्माण व्हायची. शिंगणापूर पाईपलाईनला गळती लागल्यानंतर त्याचा परिणाम ई वॉर्डमधील पाणीपुरवठ्यावर व्हायचा. 
बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रावर शहराचा जुना भाग अवलंबून आहे. तेथेही गळती लागल्यास निम्म्या शहराचा पाणीपुरवठा खंडित व्हायचा. गळती शोधण्याची अत्याधुनिक यंत्रणा पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नव्हती.

 
जुना चिव्याचा बाजार, आपटेनगर ते पुईखडी, राजीव गांधी पतसंस्था. आयटीआय, निर्माण चौक, या भागात पाईपलाईनला सातत्याने गळती लागायची. निर्माण चौक ते राजारामपुरीपर्यंतचे काम आयआरबीने पूर्ण केले. नगरोत्थान योजनेतून काही ठिकाणी पाईपलाईन बदलण्याचे काम झाले. या दोन्हींचा एकत्रित परिणाम असा झाला, की गळती उद्‌भवण्याचे प्रमाण कमी झाले. पाईप डिटेक्‍टरची नुकतीच कळंबा फिल्टर येथे चाचणी झाली. त्याचे काही सकारात्मक परिणाम पुढे आले. शहराच्या विविध भागांत डिटेक्‍टरचा वापर केला जाणार आहे. 

पाईपलाईनला अडथळे असल्यास ते शोधण्याचे काम पाईप डिटेक्‍टरच्या माध्यमातून होते. लिकेज डिटेक्‍टर गळती दाखविण्याचे काम करतो. दोन्हींचा प्रभावीपणे वापर झाल्यास गळती लवकर शोधून ती काढण्यास मदत होणार आहे. 
- भास्कर कुंभार, प्रभारी जल अभियंता 

डिटेक्‍टर करणार हे काम 
*पाईप डिटेक्‍टर किमान एक किलोमीटर अंतरापर्यंत पाईपलाईनची दिशा दाखवतो. 
* गळती नेमकी कुठे आहे? याची माहिती देतो. 
*पाईपलाईनमध्ये काही अडथळे असल्यास सिग्नलद्वारे माहिती मिळते. 
*जेसीबीचा डिझेलचा खर्च, चालकाचा पगार, कर्मचाऱ्यांची मेहनत वाचणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Detector to detect pipeline leaks