कोविड सेंटरला पायाभूत सुविधा मिळतील, पण डॉक्‍टर उपलब्धतेचा प्रश्‍नच, वाचा गडहिंग्लजमधील अडचणी

अजित माद्याळे
Wednesday, 16 September 2020

कागलच्या धर्तीवर येथील पालिकेनेही कोविड सेंटर उभारावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली असली तरी त्याची उभारणी आव्हानाचे असल्याचे चित्र दिसत आहे.

गडहिंग्लज : कागलच्या धर्तीवर येथील पालिकेनेही कोविड सेंटर उभारावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली असली तरी त्याची उभारणी आव्हानाचे असल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी गडहिंग्लज आयएमएची भूमिका काय राहणार, यावरच नव्या कोविड सेंटरचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. पालिका काहीही करून पायाभूत सुविधा देईल, पण डॉक्‍टर कोठून आणणार? हा प्रश्‍न कायम आहे. 

कागलमध्ये समाजकल्याणच्या विद्यार्थी वसतीगृहात 100 बेडेड कोविड सेंटर उभारले आहे. गडहिंग्लजमध्ये मात्र समाजकल्याणच्या दोन्ही वसतीगृहात आधीपासूनच शासनाचे कोविड सेंटर सुरू आहे. सध्या शहरासह तालुक्‍यात कोविड रूग्णांची वाढ होत आहे. ऑक्‍सीजन बेड मिळणे मुश्‍किल झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने किमान 50 बेडेड कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी होत आहे. मंत्री मुश्रीफ यांनीही तसे आवाहन केले असले तरी प्रत्यक्ष कार्यवाहीत विविध अडचणी असल्याचे चित्र आहे. 

पालिकेची पॅव्हेलियन इमारत असली तरी तेथे स्वतंत्र शौचालय व बाथरूमची सोय नाही. भाजी मंडई, जुनी कोर्ट इमारत आहे. मात्र या इमारती मार्केटमध्ये आहेत. तेथे सेंटर सुरू करणे किती योग्य आहे, याचा अभ्यास गरजेचा आहे. सेंटर उभारण्यासाठी पायाभूत सुविधाही महत्वाच्या आहेत. काहीही करून इमारत मिळालीच, तर बेडची व्यवस्था नव्याने करावी लागणार आहे. हे बेड कोठून उपलब्ध करणार, त्याचा खर्च किती याचे गणित मांडावे लागणार आहे.

मुळात पालिकेचा दवाखाना नाही. यामुळे मनुष्यबळाचाही प्रश्‍न आहे. खासगी डॉक्‍टरांना आवाहन करून त्यांच्या माध्यमातून सेंटर चालविण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यासाठी आयएमएची भूमिका महत्वपूर्ण आहे. पालिकेने आयएमए पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते. या चर्चेतून चार ते पाच डॉक्‍टरांनी वैयक्तिक कोविड हॉस्पीटल सुरू करण्याच्या मानसिकतेत असल्याचे समोर आले आहे.

फिजिशियन चार ते पाच असले तरी त्यातील बहुतांशी डॉक्‍टर 55 ते 60 वर्षावरील आहेत. यामुळे त्यांच्याकडून सेवा मिळणे संभ्रमाचे आहे. उपजिल्हा कोविड हॉस्पीटलला फिजिशियन मागणीसाठी करावा लागलेला संघर्ष डोळ्यासमोर असताना आता पालिका कोविड सेंटरमध्ये डॉक्‍टर मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. खासगी डॉक्‍टर पुढे आलेच तर त्यांना शासन दराच्या निम्म्या किमतीत उपचार करावे लागणार आहेत. त्यात त्यांना आपलेच मनुष्यबळ आणि यंत्रणा वापरावी लागणार आहे. 

मनुष्यबळाचा मोबदला 
एकीकडे शासन दराच्या निम्म्या किमतीत कोविड सेंटर चालवायचे आणि दुसऱ्या बाजूला कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाला भरमसाठ वेतन द्यावे लागणार आहे. केंद्र चालवण्यास घेणाऱ्या डॉक्‍टरांचेच मनुष्यबळ असले तरी संबंधित कर्मचारी आहे त्या पगारात काम करतील का, याची शंका आहे. सध्यापेक्षा किमान दुपटीने पगार त्यांना द्यावा लागणार आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulties To Gadhinglaj In Setting Up Covid Center Kolhapur Marathi News