भाऊ गेल्याचं दुख पचवत जिंकली पहिली स्पर्धा 

संदीप खांडेकर
Monday, 27 July 2020

थोरल्या भावाचा वयाच्या पस्तिशीत ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. अख्खं कुटुंब डगमगले. माझी साऊथ झोन टेबल-टेनिस स्पर्धा तोंडावर होती. दोन महिने सरावही थांबला होता. वडिलांनी धीर दिल्याने सरावाविनाच मी स्पर्धेत उतरले.

कोल्हापूर  : ""थोरल्या भावाचा वयाच्या पस्तिशीत ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. अख्खं कुटुंब डगमगले. माझी साऊथ झोन टेबल-टेनिस स्पर्धा तोंडावर होती. दोन महिने सरावही थांबला होता. वडिलांनी धीर दिल्याने सरावाविनाच मी स्पर्धेत उतरले. डिप्रेशनमध्ये असल्याचे प्रतिस्पर्ध्यांना कळाले होते. भावाच्या जाण्याचे दु:ख बाजूला ठेवून कुटुंब, वडील व देशासाठी खेळायचे, असे ठरवले आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. संकट कोणतेही असो, न डगमगता सामोरे जाण्याची तयारी ठेवायची, याचा पहिला धडा स्पर्धेत मिळाला,'' अर्जुनवीर पुरस्कार विजेत्या शैलजा पांडुरंग साळोखे सांगत होत्या. आयुष्यातल्या पहिल्याच प्रसंगाने त्यांना खूप काही शिकवले. त्यापुढेही त्यांच्या आयुष्यातील संकटांची मालिका थांबली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर टेबल-टेनिस खेळणाऱ्या त्या पहिल्या महिला.  कोल्हापूर भूषण, महाराष्ट्र गौरव ते अर्जुनवीर पुरस्कारांच्या मानकरी. त्यांच्या वाट्याला आलेल्या कठीण प्रसंगांचा प्रवास त्यांनी आज उलगडला. 

प्रसंग दुसरा 
कोलकत्ताजवळच्या दुर्गापूरमध्ये नॅशनल स्पर्धा होती. त्यावेळी मला काविळीची लागण झाली होती. नऊ वेळा नॅशनल चॅंम्पियन इंदुपुरी यांचे माझ्यासमोर आव्हान होते. सामन्यावेळी त्यांच्या पायात उभे राहण्याची ताकद नव्हती. अंगात तापही होता. तरीही दोन सेट जिंकले. इंदुपुरी स्थानिक असल्याने तिला समर्थकांचे प्रोत्साहन होते. त्यांच्याकडून माझे खच्चीकरण सुरू होते. अंगातील कणकणही वाढत होती. मी हिंम्मत हारायला तयार नव्हते. पण, शरीर साथ देत नव्हते. या सामन्यात पराभव झाला. मात्र, त्याचा वजावाटा अलहाबादच्या नॅशनल स्पर्धेत काढला. 

प्रसंग तिसरा 
पतियाळा सेंटरमध्ये सराव शिबिरासाठी होते. वैद्यकीय तपासणीत मला इन्फेक्‍शन झाल्याचे सांगण्यात आले. तत्काळ शिबिर सोडून जाण्याचा आदेश आला. मग एकटीच पतियाळावरून दिल्ली, मुंबई ते कोल्हापूरपर्यंतचा प्रवास करत परतले. कॉमनवेल्थला जाऊ शकले नाही, याची मनात सल होती. वडिलांनी आधार देऊन आत्मविश्‍वास उंचावला. सरावाला जोरदार सुरवात केली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदक मिळविण्याचे टार्गेट ठेवले. मग मात्र मागे वळून पाहिले नाही. 

प्रसंग चौथा 
जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. कोल्हापुरातील संस्था व नागरिकांनी स्पर्धेसाठी बारा हजारांची मदत मला केली. कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणारी मी पहिली महिला होते. कोल्हापूरकरांनी मोठ्या थाटामाटात मला स्पर्धेसाठी निरोप दिला. स्पर्धेसाठी आम्ही तिघी जाणार होतो. मुंबईतील विमानतळावर फेडरेशनच्या सदस्याने स्पर्धेसाठी मला क्‍लिअरन्स दिला नसल्याचे सांगितले. मला काय करावे, हे सुचेना. कोल्हापुरात परतल्यावर तोंड कसे दाखवायचे?, असा प्रश्‍न होता. लोकांनी दिलेल्या पैशाची चिंता होती. वडिलांनी पुन्हा धीर दिला आणि कोल्हापुरात परतल्यावर प्रत्येक संस्थेचे पैसे परत केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digesting the grief of losing his brother, he won the first competition