राजकीय पार्श्‍वभूमी नसताना स्वयंपाक घरातून थेट महापौर पदाच्या खुर्चीत 

नंदिनी नरेवाडी - पाटोळे
Wednesday, 3 March 2021

कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना महापौर पदावर विराजमान होणाऱ्या स्वाती यवलुजे या पहिल्या महापौर. 

कोल्हापूर : सर्वसामान्य घरातील एखादी महिला थेट स्वयंपाक घरातून महापौर पदाच्या खुर्चीत कशी विराजमान होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती सागर यवलुजे. सासरे पोलिस असल्यामुळे पोलिस लाईनमध्येच त्या वास्तव्यास होत्या. त्यामुळे पोलिस लाईनमधील छोट्यातील छोटी समस्या त्या जाणून होत्या. चुलत सासरे सदाशिव यवलुजे हे या प्रभागातून नगरसेवक झाले आणि पुढे त्यांनी स्थायी समिती सभापती पदावरही काम केले. हा एवढाच स्वाती यांचा राजकारणाशी संबंध; मात्र गेल्या महापालिका निवडणुकीत ओबीसी महिला आरक्षण पडताच कॉंग्रेसमधून त्यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत 900 मतांनी निवडून आल्या. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना महापौर पदावर विराजमान होणाऱ्या स्वाती यवलुजे या पहिल्या महापौर. 

स्वाती यवलुजे यांच्या कार्यकाळातील त्यांनी घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे झूम प्रकल्पामध्ये कचरा वर्गीकरण मशिन बसवण्याचा. तब्बल 18 कोटींचा प्रोजेक्‍ट. त्यांच्या या निर्णयामुळे शहरातील वाढत्या कचऱ्याची समस्या सुटण्यास मदत झाली. कोल्हापूर शहरात निर्माण होणारा मोठ्या प्रमाणातील कचरा विल्हेवाट लावण्यासाठी कसबा बावडा येथील झूम प्रकल्पात जातो; मात्र या झूम प्रकल्पात कित्येक वर्षे कचरा तसाच पडून होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व भटक्‍या कुत्र्यांचा वावर जास्त. शिवाय येथील कर्मचाऱ्यांच्या तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी नगरसेवक होताच झूम प्रकल्पामध्ये आवश्‍यक ते तंत्रज्ञान बसविले पाहिजे, याकडे पाठपुरावा केला.

हेही वाचा- ‘कोरोना’ खरेदीत ३५ कोटींचा भ्रष्टाचार ; खरेदी समितीसह लोकप्रतिनिधींकडे बोट

 महापौर पदावर काम करण्याची संधी मिळताच त्यांनी हा प्रश्‍न काही अंशी सोडवलाही. एखाद्या प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन तो प्रश्‍न सोडविण्यावर भर देणाऱ्या नगरसेवक अशी ओळख त्यांनी याच्या माध्यमातून निर्माण केली. स्वाती यवलुजे यांना पाच महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. बहुचर्चित असलेल्या अमृत योजनेतील पाणीपुरवठा स्वाती यवलुजे यांच्या काळात सुरू झाला. महापालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी टोप येथील जागा मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लाईन बाजार हा प्रभाग सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्या सध्या पती सागर यवलुजे यांना कॉंग्रेसकडून संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. 

मी महापौर पदावर कार्यरत असताना कुटुंबाने मोठा पाठिंबा दिला. या काळात मला शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेता आले. सध्या नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला असला तरी कॉंग्रेसने संधी दिल्यास आगामी निवडणुकीत पती सागर यांना निवडणुकीत उभे करण्याच्या तयारीत आहे. 
- स्वाती यवलुजे. 

संपादन- अर्चना बनगे

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Directly from the kitchen to the mayor chair women story kolhapur