जिल्ह्याच्या सीमा खुल्या केल्या, रुग्णांचे प्रमाण वाढले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या तालुक्‍यात दोन पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे.

कागल : महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या तालुक्‍यात दोन पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे. त्यामुळे खबरदारी घ्या; अन्यथा विस्फोट होईल. कोरोनाचा धोका मोठा आहे. त्याच्याबरोबर राहायचे असेल तर खबरदारी घेऊनच राहिले पाहिजे. त्यामुळे ग्रामसमित्यांनी कडक अंमलबजावणी करावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. शहरात कोरोनाग्रस्त आढळल्याने ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. येथील डी. आर. माने महाविद्यालयाच्या प्रांगणात बैठक झाली. 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ""लॉकडाउन उठल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा खुल्या केल्या. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण वाढले. तज्ञांनी जुलैअखेर कोरोनाचा धोका असल्याचे सांगितले आहे. समूह संसर्ग टाळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे टाळा, पोहणे, खेळणे बंद करा.'' 

ते म्हणाले, ""अलीकडेच तालुका कोरोनामुक्त झाला. आता शहरासह मळगे बुद्रुक येथे रुग्ण मिळून आला आहे. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. आवश्‍यकता असेल तरच बाहेर पडा.'' 

तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, भैया माने, उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, रमेश माळी आदींसह नगरसेवक उपस्थित होते. 

प्रत्येकावर बारकाईने लक्ष ठेवा...
महाराष्ट्रभरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात ग्रामदक्षता समित्यांचे योगदान मोठे आहे. अलीकडच्या काही दिवसांत समित्या ढिल्या पडल्याचे दिसून येते. समित्यांनी अजूनही कार्यक्षम बनून गावात येणाऱ्या प्रत्येकावर बारकाईने लक्ष ठेवून कुणाचीही भीड न ठेवता काम करावे, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District boundaries were opened, patients increased