जिल्ह्यातील परिषदेतील कोरोना काळातील खरेदीचे लेखापरीक्षण होणार

The district council will audit the Corona period purchases
The district council will audit the Corona period purchases

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात लागणारे साहित्य, औषधे व उपकरणे, तपासणी किट आदींची खरेदी करण्यात आली. निकड म्हणून खरेदी झाली आहे. मात्र, शासनाच्या आदेश, सूचना, नियमानुसार खरेदीची जबाबदारी संबंधित विभागांची होती. त्यामुळे विविध विभागांनी केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण व प्रशासकीय तपासणी होईल. त्यात दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज येथे दिली. 
जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे, की जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता (राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) यांना आवश्‍यकतेनुसार औषधे, उपकरणे आदी बाबी विहित प्रक्रियेचा अवलंब करून खरेदी प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्राधिकृत केले आहे. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता पाटबंधारे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग आदी अधिकाऱ्यांकडे खरेदीसह नियोजनाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्‍यक सर्व बाबींचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आहे. वैद्यकीय अधिष्ठातांना त्यांच्याकडून राबविण्यात आलेल्या खरेदी प्रक्रियेबाबत आवश्‍यक ती तपासणी व चौकशी करून कार्यवाहीचे निर्देश दिले होते. पुरवठादारांनी फसवणूक करून औषधे, उपकरणांचा पुरवठा केला असेल, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू. त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते. 
खरेदीशी जिल्हाधिकाऱ्यांचा संबंध नाही 
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांना निधी दिला आहे. त्यानुसार खरेदीची प्रक्रिया त्या-त्या विभागाकडून राबवली गेली. खरेदी प्रक्रियेनुसार वैद्यकीय उपकरणे, औषधे व इतर वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार निश्‍चित करणे, त्याचे दर निश्‍चित करणे, वस्तूंचा साठा व वितरण, गुणवत्ता तपासणी, त्यांचे अभिलेख ठेवणे, वस्तू स्वीकारणे व प्राप्त वस्तूंची देयके तपासणे, ती देणे या सर्व प्रक्रियेत जिल्हाधिकारी किंवा तांत्रिक समितीचा कोणताही सहभाग नसल्याचेही पत्रात म्हटले आहे. 


अशा आहेत सूचना 
0 विविध साहित्य, उपकरणांची अनावश्‍यक आणि जादा दराने खरेदी झाल्यास त्याची जबाबदारी निश्‍चित करावी. 
0 विविध कोविड रुग्णालयांना वितरित साहित्याचा विनियोग योग्य व शासकीय नियमाप्रमाणे झाल्याचे संबंधित रुग्णालय प्रमुखांकडून प्रमाणित करून घ्यावे. 
0 साहित्याचा विनियोग योग्यरीत्या झाला नसल्यास त्याचीही जबाबदारी निश्‍चित करावी

--संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com