राज्यात "माझे शिक्षण माझे भविष्य' अभियान 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

यापुढील काळात सर्व शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा देण्यात येणार आहे

उजळाईवाडी (जि. कोल्हापूर) -टप्प्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण हे ध्येय ठेवून "माझे शिक्षण माझे भविष्य' अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार असून यामध्ये व्यापक लोकसहभागाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापुढील काळात सर्व शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा देण्यात येणार आहे, यासंबंधीचा कृती आराखडा तयार केला जात असून यामुळे नव्या शैक्षणिक क्रांतीची सुरुवात होणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कणेरीवाडी (ता. करवीर) येथील लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या डिजिटल शाळा शाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले. 

कणेरीवाडी येथील डिजिटल शाळेमुळे जागतिक पटलावर महाराष्ट्राचे नाव उज्वल झाले असून कणेरीवाडी आता विद्यानगरी म्हणून नावारूपाला आली आहे. 

खासदार संजय मंडलिक म्हणाले, """लोकसहभागातून डिजिटल शाळेची संकल्पना संपूर्ण गावाने सत्यात उतरले असून गाव करील ते राव काय करील हे ब्रिद कणेरीवाडीकरांनी खरे करून दाखवले आहे.'' 

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, "" शिक्षकांनी स्वखर्चातून इंटरनेट वापर करीत मुलांना शिक्षण देण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले. 713 मुले कणेरीवाडी शाळेत शिकत असून राज्यात एक रोल मॉडेल म्हणून कणेरीवाडी शाळेचा नावलौकिक वाढत आहे.'' 

अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील,उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शशिकांत खोत, हंबीरराव पाटील, स्वाती सासणे, प्रवीण यादव, पद्माराणी पाटील,अश्विनी धोत्रे, सुनील पवार,सुनिता कांबळे,मंगल पाटील, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गटविकास अधिकारी जयवंत ओगले, गटशिक्षणाधिकारी शंकर यादव, संगीता खोत,सरपंच शोभा खोत उपस्थित होते. 
स्वागत मुख्याध्यापक राहुल ढाकणे यांनी केले. 

 
तीस लाखाची लोकवर्गणी 
विद्या मंदिर कणेरीवाडी डिजिटल शाळेसाठी गोकुळने तीन लाख, शशिकांत खोत यांनी पाच लाख, शिक्षकांनी सव्वा लाख ,तसेच अनेक उद्योगपती नागरिक यांनी तीस लाखापर्यंत साहित्य व रोख रकमेच्या स्वरूपात मदत केली. तसेच गावातील कुशल कारागीर व तंत्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात श्रमदान करून शाळेस मदत केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education minister varsha gaikwad kolhapur