esakal | कुटुंब नियोजनावर असा झाला आहे कोरोनाचा परिणाम!
sakal

बोलून बातमी शोधा

effect of Corona on family planning

शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांना शासनातर्फे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती, जमाती व दारिद्य्ररेषेखालील महिलांना ६०० तर अन्य महिलांना २५० रुपये अनुदानापोटी मिळतात. पुरुषांना ११०० रुपये अनुदान दिले जाते. 

कुटुंब नियोजनावर असा झाला आहे कोरोनाचा परिणाम!

sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज (कोल्हापूर) : लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी सर्वांत प्रभावी उपाय म्हणून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पाहिले जाते. त्यामुळे शासन पातळीवरुनही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होते; पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया थांबविल्या आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी एकूण उद्दिष्टापैकी जवळपास निम्म्या शस्त्रक्रिया एप्रिल व मे महिन्यातच होतात. मात्र, यंदा कुटुंब नियोजनासाठी सुट्टीचा कालावधी टळणार हे निश्‍चित आहे.

शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांना शासनातर्फे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती, जमाती व दारिद्य्ररेषेखालील महिलांना ६०० तर अन्य महिलांना २५० रुपये अनुदानापोटी मिळतात. पुरुषांना ११०० रुपये अनुदान दिले जाते. 

आरोग्य विभागाच्या गावपातळीवरील यंत्रणेकडून कुटुंब नियोजनासाठी नोंदणी करुन घेतली जाते. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी शिबिर घेऊन या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. संसर्गाचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच ठिकाणच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया थांबविल्या आहेत. सद्यःस्थिती पाहता नजीकच्या दीड-दोन महिन्यात शस्त्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता कमीच आहे. 

दरम्यान, एप्रिल व मे महिना हा सुट्टीचा कालावधी आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, पुण्याला असणारी कुटुंबे गावी येतात. तसेच या कालावधीत शेतातील कामेही कमी असतात. त्यामुळे या महिन्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेण्याकडे अधिक कल असतो.

हे पण वाचा - कोरोनाशी लढणार आता ही गोळी 


जिल्ह्यासाठी १९ हजारांचे उद्दिष्ट..
गतवर्षी म्हणजे २०१९-२० मध्ये जिल्ह्यासाठी १९ हजार ३२१ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. यापैकी ७५.०८ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यातच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया थांबविल्याचा परिणाम उद्दिष्टपूर्तीवरही झाल्याचे दिसूते. गतवर्षीचेच उद्दिष्ट यंदा कायम केले आहे.

हे पण वाचा -  मद्यविक्री दुकानदारांची का उडाली झोप ? 


एप्रिल, मे महिने सुट्टीचे आहेत. त्यामुळे वर्षातील सर्वांत जास्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या महिन्यात होतात. कोरोनामुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत.
- डॉ. एम. व्ही. अथणी, तालुका आरोग्य अधिकारी, गडहिंग्लज

go to top