आठ दिवसांनी जयसिंगपूर सुरू, पण दिवस गेला वाहतूक कोंडीत 

Eight days later Jaisingpur started
Eight days later Jaisingpur started

जयसिंगपूर : आठ दिवसांच्या जनता कर्फ्युनंतर शहरातील बाजारपेठ शुक्रवारपासून सुरळीत झाली. मात्र, ग्राहकांच्या नोंदीला व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मास्कचा वापर नागरीकांकडून कटाक्षाने करण्यात आल्याचेही चित्र शहराच्या विविध मार्गावर पाहायला मिळाले. मात्र, पहिल्याच दिवशी शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत मार्गावर वाहतूकीचा बोऱ्या उडाला. शहराच्या प्रत्येक वळणावर वाहतूकीची कोंडी निर्माण झाली. 

शहरात कोरोनाने ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यु झाल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने शहर लॉकडाऊन केले. गेल्या आठ दिवसापासून शहरातील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले. व्यापारी आणि व्यावसायिकांनी याबाबत पालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना प्रत्येक वेळी रुग्ण सापडला तर शहर बंद करणार का?, आमच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, आमच्या व्यथा समजून घ्या, शहर बंदबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत का? अशा प्रश्‍नांची सरबती करुन शहरातील व्यवहार पूर्ववत करण्याची मागणी केली. 

पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शुक्रवापासून व्यवहार सकाळी नऊ ते रात्री सात यावेळेत सुरु करण्यास परवानगी दिली. आठ दिवसानंतर शहरातील व्यवहार सुरु झाले. जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरीकांनी दुकानांमध्ये गर्दी केली. शहराच्या प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावर यामुळे वाहतूकीची कोंडी निर्माण झाली. मात्र, नागरीकांनी सर्रासपणे मास्कचा वापर केल्याचे आशादायक चित्र पहायला मिळाले. भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेत्यांसह व्यावसायिकांनीही मास्कचा वापर केला. 

वाहने अस्ताव्यस्त पार्किंगमुळे शहरात स्टेशन रोड, वाडी रोडसह अंतर्गत मार्गावर कोंडी निर्माण झाली. वाहतूक पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमी प्रमाणातील कर्मचाऱ्यांमुळे पूर्णपणे यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य झाले नाही. दुपारनंतर वाहतूकीची कोंडी काही प्रमाणात कमी झाली. नेहमी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीकडेच नागरीकांचा कल राहिला. हॉटेलमध्ये केवळ पार्सलची सोय असली तरी अद्याप खवय्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हॉटेल शांत होते. मोबाईल, सराफ बाजारातही तुरळत गर्दी होती. तर भाजीपाला खरेदीकडे विशेष कल राहिला. जनता कर्फ्युच्या काळात भाजीपाला विक्रीवर मर्यादा आल्याने भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. 

शहरात अद्याप तीन कंटेन्मेंट झोन 
शहरात आतापर्यंत सात कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील एका ज्येष्ठाचा मृत्यु झाल्यानंतर पालिका प्रशासनाने जनता कर्फ्युचा निर्णय घेतला. शुक्रवारपासून शहरातील व्यवहार सुरु झाले असले तरी अद्याप शहरातील गल्ली क्रमांक दहा लक्ष्मीरोड, गल्ली क्रमांक तीन स्टेशन रोड आणि काडगे मळ्यात तीन ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत. या भागातील अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य व्यवहारांवर मर्यादा आहेत. 

मास्क वापराबाबत जागरुकता गरजेची 
शुक्रवारी कामानिमित्त बाहेर पडलेल्या बहुतांश नागरीक मास्क वापराबाबत जागरुक राहिले. तर बेशिस्त वाहने पार्किंगमुळे वाहतूकीची कोंडी झाली. वाहतूकीची कोंडी हा शहरातील जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनला असून पोलिस प्रशासनानेही शहरात स्वतंत्र वाहतूक शाखेचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

दृष्टिक्षेप 
- ग्राहकांच्या नोंदीला व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद 
- बहुतांश नागरिकांकडून मास्कचा वापर 
- मुख्य मार्गावर मोठी वाहतूक कोंडी 
- सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत व्यवहार सुरू 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com