
पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण होईल; मात्र प्रत्यक्ष निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या कितपत वाढेल, याचा अंदाज येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक आता एक महिना पुढे जाण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत कोराेनाने डोके वर काढल्याने मतदार यादीच्या कार्यक्रमाची प्रक्रिया निवडणूक आयोगाने थांबविली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण होईल; मात्र प्रत्यक्ष निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
प्रारूप मतदार यादीवरील हरकती निकालात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. बारा मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. नंतर निवडणुकीची तारीख जाहीर होईल, असे सांगितले जात होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक लागेल, अशी चिन्हे होती. नवी मुंबईसह, कोल्हापूर तसेच अन्य काही महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य शासन सतर्क झाले आहे.
हेही वाचा - मुलानं प्रेमविवाह केला; वडिलांवर घरात घुसून जीवघेणा हल्ला -
निवडणुका म्हटले की प्रचारफेऱ्या, राजकीय सभा, त्यामुळे होणारी गर्दी आणि त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास करायचे काय, असा प्रश्न आहे. तूर्तास शासनाने राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांना काही दिवसांसाठी बंदी घातली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली म्हटले, की भागाभागांत धांदल सुरू होते. त्यातून कोरोना वाढेल, या भीतीपोटीच तूर्तास निवडणुका न घेण्याच्या पवित्र्यात निवडणूक आयोग आहे. नवी मुंबईच्या मतदार यादीचा कार्यक्रम याच कारणामुळे थांबविण्यात आला.
आजी-माजी नगरसेवक, नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांनी सध्या जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांच्या स्तरावर नियोजन सुरू आहे. आरक्षण सोडत २१ डिसेंबरला झाल्यापासून प्रभागात धांदल उडाली आहे. महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० ला संपली आहे. प्रशासकांचा कालावधी १५ मेपर्यंत आहे. त्याअगोदर निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल.
संपादन - स्नेहल कदम