
गावच्या वेशीवरून डॉ. दिपीका, तिर्था यांची तुतारी सह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
घुणकी (कोल्हापूर) : मुलगा वंशाचा दिवा असल्याने स्त्री भ्रूणहत्या होत आहेत. आधुनिक युगातच मुलींचा टक्का घसरत असल्याचे चित्र असतानाच देशसेवेतून कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या गणपतराव महाडिक यांनी नातीचे स्वागत चावरे येथील आपल्या घरी हत्तीवरून मिरवणूक काढत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवल्याने त्यांचे परीसरात प्रचंड कौतुक होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे येथील देशसेवेतून निवृत्त झालेले कॅप्टन व विश्व वारणा पब्लिक स्कूलचे संस्थापक गणपतराव भगवान घोडके ,संपतराव भगवान घोडके(महाडिक)यांची नात व दिपक व सौ.डॉ. दिपीका महाडिक यांची कन्या तिर्था हिचे पहिल्यांदा चावरेत आगमन होणार होते. समाजात मुलगाच वंशाचा दिवा असल्याने स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. मुलगी झाल्यानंतर त्या घरात प्रचंड निराशा पसरते. आणि तिला मामाच्या गावातून आपल्या घरी चुपचाप आणले जाते.
कॅप्टन गणपतराव भगवान घोडके, पत्नी अलका,मुलगा दिपक, स्नुषा डॉ. दिपीका महाडिक यांनी "कन्या वाचवा अभियान,स्त्री भ्रूणहत्या" मुलींच्या बाबतचा समाजा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि जनजागृती होण्यासाठी 'तिर्था' ची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे वनविभाग,पोलीस या यंत्रणांची परवानगी काढून हत्ती आणण्यात आला.
गावच्या वेशीवरून डॉ. दिपीका, तिर्था यांची तुतारी सह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. हत्तीवरून पेढे,साखर वाटप करण्यात आली. मुली सुध्दा मुलांच्या बरोबरीने कर्तव्य बजावतात. या निमित्त मुलींचे शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यानंतर रात्री स्नेह भोजना नंतर स्वरसंगीत कार्यक्रमातील मराठी, हिंदी भक्तीमय गितांनी नागरीकांची मनोरंजनासह मेजवानी झाली.
या आगळ्या वेगळ्या स्वागताने मुलींच्या विषयी प्रेम पहायला मिळाले. यामुळे परीसरात महाडिक कुटुबिंयाचे कौतुक झाले. हा उपक्रम पाहण्यासाठी चावरे परीसरतील नागरीकांनी गर्दी केली.महाडिक कुटुबिंयासह विश्व वारणा पब्लिक स्कूलचे सचिव डी.पी. पाटील, प्रा.संभाजी पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
संपादन- अर्चना बनगे