पाच हजारांची लाच घेताना पंटरसह महावितरणचा अभियंता जाळ्यात  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 December 2020

रितसर प्रक्रीया करुन वीज कनेक्शन देण्यात आले. त्यानंतर लाटकर यांने तक्रारदाराशी संपर्क साधून तुमचे मीटर मंजूर झाले असून पाच हजार देण्याची मागणी केली

इचलकरंजी - वीज कनेक्शन दिल्याबद्दल बक्षीस म्हणून पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरण कंपनीच्या कबनूर शाखेतील सहाय्यक अभियंता अमर बाळासो कणसे (वय 30, रा. अवधूत आखाडा) याच्यासह पंटर हारुण रशिद इब्राहीम लाटकर (40, आवळे चौक, झोळ कारखाना परिसर) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

लाटकर यांने ही लाच घेतली असून यातील 2 हजार रुपये कणसे याच्यासाठी तर 3 हजार रुपये स्वतःसाठी घेतल्याचे कबुल केले आहे. लाटकर याच्या न्यू भारत लाईट हाऊस या दुकानात ही लाच घेतांना पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकांने आज दुपारी ही कारवाई केली.

या प्रकरणातील तक्रारदार यांनी फर्निचर व्यावसायासाठी कबनूरमधील मराठी शाळेजवळ भाड्याच्या जागेवर शेड उभारले आहे. या शेडमध्ये थ्री फेजच्या वीज कनेक्शनची मागणी महावितरणच्या कबनूर शाखेकडील सहाय्यक अभियंता कणसे याच्याकडे केली होती. त्यांनी लाटकर यांना भेटण्याचा सल्ला तक्रारदारांना दिला. त्यानुसार तक्रारदारांनी लाटकर यांना भेटल्यानंतर मीटर मंजूर केल्यानंतर पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. 

दरम्यान, तक्रारदारांनी दिलेल्या अर्जानुसार रितसर प्रक्रीया करुन वीज कनेक्शन देण्यात आले. त्यानंतर लाटकर यांने तक्रारदाराशी संपर्क साधून तुमचे मीटर मंजूर झाले असून पाच हजार देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची दोनवेळा पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. यामध्ये लाटकर हा कणसे याच्यासाठी पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 

हे पण वाचा - पीककर्ज वाटपात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम

वीज कनेक्शन दिल्याबद्दल बक्षीस म्हणून 5 हजार रुपये घेतले असून त्यातील दोन हजार रुपये कणसे याच्यासाठी घेतल्याचे लाटकर यांने कबुल केले. या प्रकरणी दोघानांही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उपअधिक्षक बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईत पोलिस निरिक्षक युवराज सरनोबत, हवालदार शरद पोरे, विकास माने, नवनाथ कदम, सुनिल घोसाळकर सहभागी झाले होते.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: engineer arrested for taking bribe in ichalkaranji