दोन हजारावर भाविक बसविणार पर्यावरणपूरक गणेश मुर्ती 

संजय दाभाडे 
शुक्रवार, 3 जुलै 2020

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निश्‍चय केला आहे.

कोल्हापूर ​: प्लास्टर ऑफ पॅरिस आणि तैलरंगमिश्रित गणेश मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे नदी, विहिरी, तलाव यामधील जलसाठा प्रदूषित होत आहे, पर्यावरणाची हानी होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निश्‍चय केला आहे. त्यामुळे कळंबा परिसरातील कुंभार वाड्यात दोन हजारपेक्षा जास्त शाडूच्या मूर्ती बनवल्या जात आहेत. दरम्यान, गोवा, कर्नाटक यासह अनेक परराज्यांतील ग्राहकांकडून येथील कुंभार बांधवाकडे शाडूच्या मूर्तींची मागणी केली आहे. 

गणेशोत्सवाला 22 ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. कळंबा परिसरातील अनेक कुंभार वाड्यात कुंभार बांधव कुटुंबीयांसह मूर्ती तयार करत आहेत. भाविकांच्या मागणीनुसार सहा इंचापासून दोन फुटांपर्यंत देवदेवता व विविध स्वरूपातील शाडूच्या मूर्ती बनवल्या जात आहेत. 

यंदाच्या वर्षी अनेक भाविकांनी इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. तसेच घरगुतीपूजनासाठी कुंभार बांधवांकडे शाडूच्या मूर्तींची मागणी केली आहे. त्याचबरोबर शेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिर येथे विद्यार्थ्यांनी कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना भाविकांतून मागणी होत आहे. दरम्यान, पन्हाळा, जोतिबा, कोकणसह कर्नाटकातील कुन्नूर, गोकाक गावांमधून येथील कुंभार बांधवांनी मूर्ती तयार करण्यासाठी शाडू उपलब्ध केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्यामुळे शाडू कमी प्रमाणात उपलब्ध झाला आहे. तसेच मूर्ती ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर गगनाला भिडले आहेत. 

दरवर्षी दहा लाखांची उलाढाल... 
कळंबा परिसरातील अनेक कुंभार बांधव वर्षभर गणेश मूर्ती बनवतात, तर काहीजण मूर्ती बनवण्यासाठी गुढी पाडवा व अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधतात. येथील कुंभार वाड्यामध्ये घरगुती पूजनासह तरुण मंडळाच्या मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार केल्या जातात. यानिमित्ताने प्रत्येक वर्षी गणेश मूर्तीच्या विक्रीमधून 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची उलाढाल होते. 

घरगुती पूजनासाठी अनेक ग्राहक शाडूच्या गणेश मूर्तीची मागणी करत आहेत. मात्र, शाडू मिळत नसल्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्तींचा पर्याय पुढे आला आहे. शासनाने मोठ्या प्रमाणात शाडू उपलब्ध करून दिला तर भाविकांना शाडूच्या श्री मूर्तीं तयार करून देता येतील. 
- रमेश मगदूम, गणेशमूर्ती कारागीर, कळंबा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Environmentally friendly Ganesh idol to be installed