फेक कॉलची अग्निशामक दलास डोकेदुखी

Fake call firefighters headaches
Fake call firefighters headaches


"आमचं पोरगं वेळेवर जेवत नाही, सारखं फोनबरोबर खेळत बसतंय बघा, जरा रागवा त्याला.' "आमची म्हस आजारी आहे. दुधाला कमी आली आहे, तिला दवाखान्याला न्हायला गाडी मिळंल काय ?' किंवा "मागच्या महिन्यात आमच्या गल्लीत एक मयत झाले, तुमची गाडी एक तास उशिरा का आली, तुमचा सायेब कोण आहे.?' "मी अमूक मागणीसाठी आत्मदहन करणार आहे, तुम्हाला सांगायला लागतंय म्हणून फोन केला...' या व अशा निव्वळ टाईमपास गप्पा अग्निशामक दलाच्या फोनवर मारणाऱ्यांचा वर्षानुवर्षांचा उपद्रव अग्निशामक दलाला सोसावा लागत आहे. अशा फेक फोनमुळे अग्निशामक दलाचा फोन अनेकदा बिझी ठेवण्याचा प्रयत्न काही उपद्रवी करत आहेत. ही समस्या कशी सोडवायची, असा पेच अग्निशामक दलापुढे आहे. 

शहरात कोणत्याही ठिकाणी दुर्घटना घडली की, तातडीने मदतीसाठी धावून येतात ते महापालिकेचे अग्निशामक दलाचे जवान. कोणाचा मृत्यू झाला की, शववाहिका येते. मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाते. रस्ते दुर्घटनेच्या वेळी जखमींना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी याच विभागाची रुग्णवाहिकाही तातडीने येते. अशा गंभीर प्रसंगात अग्निशामक विभागाचा फोन कोणीही सहज फिरवू शकतो. फोनवर घटनेचा तपशील व अचूक पत्ता सांगितला की, ही अग्निशामक दलाची सेवा मिळते. त्यासाठी अग्निशामक दलाचा फोन नंबर सोपा तीन अंकी ठेवला आहे; मात्र काही रिकामटेकडे लोक सतत फोन करतात. काही अर्थहीन मुद्दे उपस्थित करून जास्त वेळ बोलत राहतात. असे अर्थहीन बोलणे सुरू असलेल्या वेळी अन्यत्र कोठे दुर्घटना घडली, कोणी अग्निशामक दलाची मदत मागण्यासाठी फोन केला तर त्याला अग्निशामक दलाचा फोन बिझी लागतो. तो फोन किमान पाच- दहा मिनिटे चालू राहतो. त्यामुळे पहिला फोन बंद करून दुसरा फोन घेईपर्यंत पाच-सात मिनिटांचा अवधी वाढतो. या काळात मदत पोहचण्यासाठी पाच-सात मिनिटांचा वेळ लागतो. या काळात हानी वाढू शकते; मात्र अशा अर्थहीन बोलणाऱ्यांचा फोन वरील उपद्रव वाढता असल्याने किरकोळ वाटणारी ही समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. यातून अग्निशामक दलाचे पथक हवालदिल झाले आहे. 
कुठल्या तरी मागण्यांचे आंदोलन म्हणून निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला जातो. त्याची दखल घेत अग्निशामक दलाची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जाऊन थांबते. आत्मदहन करणारा आत्ता येईल, मग येईल करत तब्बल 24 ते 48 तास गाडी थांबून राहते. त्यासोबत चार कर्मचारीही गुंतून पडतात. इशारा देणारे आंदोलक अनेकदा आंदोलनस्थळी फिरकतही नाहीत. गाडी थांबून निघून जाते. अग्निशामक दलाची गाडी ज्या प्रभागातून पाठवली गेली, त्या प्रभागाशेजारी किंवा अवती भोवती कुठे दुर्घटना घडली तर त्या ठिकाणची गाडी तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलनाच्या वर्दीसाठी गुंतलेली असते. त्यामुळे दुर्घटनेच्या वेळी दुसऱ्या प्रभागातील गाडी मदतीसाठी पाठवावी लागते. ही गाडी पोहचण्यासाठी पाच-दहा मिनिटांचा विलंब आणखी जास्त लागतो. या काळात दुर्घटनेची व्याप्ती वाढून जीवित व वित्तहानी वाढण्याचा संभव आहे. 

-प्रश्‍न 
अग्निशामक दलाला फेक कॉल करणाऱ्यांवर फारशी कारवाई होत नाही. 
अग्निशामक दल प्रत्येक वेळी तक्रार देत नाही, याचा गैरफायदा घेतला जातो. 
पोलिसांकडे मोजक्‍याच प्रकरणात तोंडी तक्रारी करण्याकडे दुर्लक्ष, 
फेक कॉलद्वारे नागरिकांचे नुकसान वाढते. त्याची जबाबदारी कोणाची? 

वस्तुस्थिती 
कॉलर आयडीवरून फेक कॉलचा शोध घेऊन कारवाई शक्‍य 
लहान मुलांच्या हातात फोन दिल्यामुळे अनेकदा लहान मुलांकडून कॉल येतात. 
काही मद्यपी धुंदीतील अवस्थेत बोलत असल्याचेही जाणवते. 
काहीजण अग्निशामक दलाच्या सेवेविषयी तक्रार करीत शिवराळ भाषेतही बोलतात. 

उपाययोजना 
शासकीय कामात अडथळा करणे किंवा आपत्ती निवारणविषयक कायद्याच्या आधारे पोलिसांना कारवाई करता येणे शक्‍य. 
अग्निशामक दलाला दिलेल्या तक्रारींची पोलिसांनीही दखल घेणे अपेक्षित आहे. 
विनाकारण चुकीची माहिती देणाऱ्यांचा, दिशाभूल करणाऱ्यांचा एक वर्ग आहे. त्याला शोधून समज देणे आवश्‍यक आहे. 
त्यासाठी अग्निशामक दलाच्या फोन नंबर्सचे महत्त्व सांगणारी जनजागृती आवश्‍यक. 

""नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनावेळी अग्निशामक दल मदत कार्य करते. येथे नागरिकांनी मदत जरूर मागितली पाहिजे; मात्र काहीजण दिशाभूल करणारी माहिती देतात, मदतीशिवाय अन्य कोणत्या तरी वेगळ्याच विषयावर बोलत राहतात. असे उपद्रव देणारे फोन सतत येतात. त्यामुळे अग्निशामक दलाला मनस्ताप होतोच. अशात दुसऱ्या कोणत्याही गंभीर घटनेत मदत मागण्यासाठी अन्य कोणी फोन करीत असेल तर त्याला दलाचा फोन बिझी लागतो. त्यामुळे लोकांनी अग्निशामक दलाचे कार्य समजून घेणे, सहकार्य करणे अपेक्षित आहे. सतत उपद्रव देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा अवलंब योग्य वेळी करूच.'' 
-रणजीत चिले, मुख्य अग्निशामक अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका. 

""अग्निशामक दल दुर्घटनेवेळी मदतीला धावून येतो. अनेकदा अग्निशामक बंब सायरन किंवा घंटा वाजवत रस्त्याने जात असतो. रस्त्यात वाहने असतात. बहुतांशी वाहने बंबाला साईड देतात; मात्र काहीजण अग्निशामक दलाच्या बंबापुढेच अडथळा करीत वाहन चालवतात. अशा वेळी घटनास्थळी पोहचण्यासाठी विलंब होतो, तसेच अपघाताची शक्‍यताही वाढते, तर दुर्घटनेवेळी अनेकजण व्हिडीओ चित्रीकरण करणे, सेल्फी काढणे असेही प्रकार करीत मदत कार्यात अडथळे आणतात. या गोष्टी टाळणे गरजेचे आहेच. मदत कार्यात अडथळा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची गरज आहे.'' 
-सर्जेराव शिंदे, आपत्ती निवारण स्वयंसेवक. 

""कोरोना काळात कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी अग्निशामक दलाच्या दोन शववाहिका दिवस-रात्र येथे सज्ज आहेत. या गाडीवर ड्यूटी करणारा कर्मचारी वर्ग जोखीम पत्करून खबरदारी घेत मृतदेह हाताळतो. सुरक्षितरित्या स्मशानभूमीपर्यंत मृतदेह पोहचवले आहेत. स्मशानभूमीवरील कर्मचाऱ्यांनीही पुढे अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे करीत असताना शहरात कोरोनाव्यतिरिक्त अन्य कारणाने मृत्यू झाल्यास त्यांचेही मृतदेह स्मशानभूमीत पोहचविण्यासाठी हा विभाग तत्पर राहिला आहे. या विभागाच्या कार्याविषयी कृतज्ञता बाळगणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.'' 
-विजय पाटील, आरोग्य मित्र.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com