रोहिणीचा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांची घाई

रोहिणीचा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांची घाई

कोल्हापूरः रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर पेरणी म्हणजे "रोहिणीचा पेरा, फुलेल मोत्याचा तुरा' ही शेतकऱ्यांत भावना असल्याने आज जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुळवाफ पेरण्यास सुरवात झाली. आज या मुहुर्तावर भात व धण्याची बहुतेकांनी पेरणी केली. पेरणीचे पारंपारिक साधन असलेल्या कुरीचे (तिफन) पूजन करण्यात आले. 
शेतीची साधने, पद्धती कितीही आधुनिक झाली असली तरी शेतकरी परिवाराचे अद्याप पिढ्यानपिढ्या परंपराशी नाते आहे. त्यानुसार आज रोहिणी नक्षत्राचे निमित्त साधत शेतकऱ्यांनी शेणाने सारवलेल्या जमिनीवर कुरीचे पूजन झाले. शेतीतून मिळणारे उत्पन्नच कुटुंबाचा मोठा आधार असल्याने सर्व कुटुंबिय या पुजेत सहभागी झाले. 
बहुतेक शेतकऱ्यांनी सहकुटुंब मिळूनच पेरणीला प्रारंभ केला. पेरणीला कुरीचा दांडा घेऊन पुढे ओढणारे व मागे पेरणीसाठी दाणे सोडणारे एकाच घरातील त्यामुळे सहकुटुंब कष्टाचेही दर्शन या निमित्ताने घडले. पेरणीनंतर लगेच पाणीही देण्यात आले. रोहिणी नक्षत्रावर पेरणी झाली की एक दोन दिवसात पावसाची एखादी सर पडून जाते अशी एक शेतकऱ्यात भावना आहे. 

50 टक्के पेरण्या पूर्ण 
माजगाव ः
येत्या काही दिवसात मान्सूनची सुरू होईल या आशेवर पन्हाळा तालुक्‍यातील यवळूज,पडळ,सातार्डे, माजगाव, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे,माळवाडी आदी गावात धुळवाफ भात पेरणीला प्रारंभ झाला आहे. 
जवळपास 50 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 
मशागत करून शेतकरी कुरीच्या साह्याने धुळवाफ पेरण्या करत आहेत. शेतकरी पारंपरिक बियाणे टाळून संकरीत वाणाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या विविध भात बियाण्यांचा वापर करत आहेत.या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्राकडे धावपळ करावी लागते. कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे.मशागतीसाठी बैलांचा वापर कमी झाला आहे. ट्रॅक्‍टर व पावर टिलरचा वापर वाढला आहे. जेथे पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भात पेरणी करून पाणी दिले आहे .मान्सून आगमनाची शक्‍यता गृहीत धरून खरिपाच्या कामासाठी शिवार माणसांनी फुलली आहेत.मे अखेर धुळवाफ भात पेरणी पूर्ण होईल अशी शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com