शेतकऱ्यांना मिळणार एकाच अर्जाद्वारे सर्व लाभ

Farmers Will Get All The Benefits Through A Single Application Kolhapur Marathi News
Farmers Will Get All The Benefits Through A Single Application Kolhapur Marathi News

चंदगड : राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना सर्व योजना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या महा-डीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना' सदराखाली अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणक प्रणालीच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे. 

शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्याला स्वतंत्र अर्ज करावा लागतो. अर्जासोबत जोडण्याची बहुतांश कागदपत्रे तीच असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने नवी संगणक प्रणाली अंमलात आणली आहे. महा डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ असून त्यावरील "शेतकरी योजना' हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीच्या संग्राम केंद्रातून वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संबंधित संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. आधार क्रमांक नसल्यास प्रथम आधार केंद्रामध्ये जाऊन आधार क्रमांक घ्यावा लागेल. पोर्टलवर अर्ज दाखल केल्यानंतर एकूण अर्जांची ऑनलाईन लॉटरी काढण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांची पूर्व संमती घेणे, अन्य माहिती घेतली जाईल. त्यानंतर त्या लाभार्थ्याला थेट खात्यावर अनुदान वितरण केले जाईल. या सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत.

या प्रणालीमध्ये शेतकरी जी योजना घेऊ इच्छितो त्या अनुषंगाने पसंतीच्या बाबींचे निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पूर्वी अर्ज भरला असल्यास नवीन अर्ज भरण्याची गरज नाही, मात्र लाभाच्या घटकांमध्ये बदल करता येऊ शकतो. यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर आलेले अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी सांगितले. 

त्रास कमी होणार
शासनाच्या कृषी विभागाने एकाच अर्जाद्वारे शेतीविषयक बहुविध योजना स्वीकारण्याची संधी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. या योजनेचे स्वागत आहे. 
- रमेश सगुण देसाई, गवसे, शेतकरी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com