फ्लॅशबॅक ; 'आमचा पैलवानकीचा हिसका दाखवू', शड्डू घुमला अन्‌ चित्रनगरी वाचली!

flashaback story of sambhaji gandmale in kolhapur protect chitranagri
flashaback story of sambhaji gandmale in kolhapur protect chitranagri

कोल्हापूर : पंचवीस सप्टेंबर १९८४ च्या कोनशिला समारंभापासून ते आजतागायत तीन तपांचा विचार केला तर चित्रनगरीचा प्रकल्प वाचवण्यापासून ते तिच्या पुनरुज्जीवनासाठीचा संघर्ष मोठा राहिला. हा प्रकल्पच कोल्हापुरातून हलवण्याचा काहींचा प्रयत्न सुरू असताना महापालिकेच्या पहिल्या सभागृहाचे शेवटचे महापौर (कै.) बळीराम पोवार यांनी कोल्हापुरी स्टाईलमध्ये ‘आमचा पैलवानकीचा हिसका दाखवू’, असा सज्जड दमच दिला आणि हा प्रकल्प येथेच राहिला; मात्र त्यानंतरही अलीकडच्या तीन ते चार वर्षांतच खऱ्या अर्थाने चित्रनगरी विविध अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होऊ लागली. आता तर मोठे प्रोजेक्‍ट येथे शूटिंगसाठी येऊ लागले आहेत.

मोरेवाडीच्या माळावर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते चित्रनगरीचा कोनशिला समारंभ झाला. तेव्हापासून अपुरा निधी, तुटपुंजी साधनसामग्री यामुळे येथे कधीच उत्साहाचे वातावरण नव्हते. तोट्यातील महामंडळे बंद करावीत, या आदेशाने तर येथे अधिकच अस्वस्थता निर्माण झाली. चित्रपट महामंडळाबरोबरच स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी सातत्याने आवाज उठवला; पण शासनदरबारी तो कधीच ऐकू गेला नाही. चित्रनगरी तोट्यात नसल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. समिती नेमण्यात आली; पण शासनाने केवळ आणि केवळ आश्‍वासनांचीच खैरात केली. तरीही ‘संघर्ष कोल्हापूरला नवीन नाही’, याची प्रचीती प्रत्येक टप्प्यावर कोल्हापूरकरांनी दिली आणि शासनाला वेळोवेळी खडबडून जागे केले. 

खरे तर मोरेवाडी ग्रामपंचायतीने ही जागा चित्रनगरीकडे दिली, त्या अपेक्षा पहिल्यापासून पूर्णपणे फोल ठरत गेल्या. चित्रनगरी झाल्यास गावाचे नाव देशभरात होईल, पर्यटनाला चालना मिळेल, गावातील अर्थकारण उंचावेल आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे चित्रनगरी बंद करायची झाल्यास ती जागा पूर्ववत ग्रामपंचायतीकडे द्यावी, अशी मागणीही मध्यंतरीच्या काळात झाली. कारण चित्रनगरीची ७५ एकरांची जागा कुणीतरी घशात घालेल आणि ‘तेलही गेले आणि तूपही’ अशी अवस्था येण्याची भीती स्थानिक नागरिकांना होती; मात्र त्याचवेळी कधीतरी येथे शूटिंगला बहर येईल, अशी आशाही होती. अजय सरपोतदार चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष असताना चित्रनगरीचा नियोजित आराखडा तयार झाला.

अंधेरीतला यशराज स्टुडिओ, गोरेगावची दादासाहेब फाळके चित्रनगरी, हैदराबादची रामोजी राव फिल्म सिटी या भारतातल्या तीन सर्वोत्तम चित्रपट निर्मिती स्थळांपेक्षाही अधिक चांगला असा हा आराखडा होता आणि ‘स्क्रिप्ट टू सेन्सॉर’ या संकल्पनेवर तो बेतला होता; पण त्यासाठी फारसा निधी हाती लागला नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवरही विविध माध्यमातून शासनाकडे चित्रनगरीसाठी वारंवार पाठपुरावा सुरू राहिला आणि गेल्या पाच ते सहा वर्षांपासून चित्रनगरीच्या पुनरूज्जीवनाला गती आली.

लवकरच आता ही चित्रनगरी शूटिंगबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होईल, अशा एका टप्प्यावर आली आहे. कारण सध्या विविध प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. चित्रनगरी येत्या काळात सुवर्णकाळ नक्कीच अनुभवेल; पण हा प्रकल्प कोल्हापुरातून हलवण्यासाठी प्रयत्न होताच महापालिकेतून शड्डू घुमला नसता तर कदाचित आजचे हे चित्र अनुभवायला मिळाले नसते, हे नक्की! 

साहेब ह्योच वकूत आला...

ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्या वेळी स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांनी चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनाचा आग्रह ठोसपणे मांडला आणि तो अगदी कोल्हापुरी स्टाईलने मांडला. २००७ मध्ये राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार व पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा शिवाजी स्टेडियमवर रंगला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, प्रसिद्ध निर्माते यश चोप्रा, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासमोर ‘साहेब ह्योच वकूत आला...’ अशी शाहिरी साद स्थानिक कलाकारांनी घालत सर्वांचेच लक्ष चित्रनगरीच्या प्रश्‍नाकडे वेधले होते.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com