कोल्हापुरातील स्मिथीया फुलांचं मसाई पठार खुणावतेय पर्यटकांना

राजेंद्र दळवी
Wednesday, 23 September 2020

रंगीबेरंगी रानफुले, निसर्ग निर्मित नवरंगांचा उत्सव पहाण्यास हौशी पर्यटक पठाराला भेट देत आहेत. 

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्चिमेकडील महाराष्ट्रातील सर्वात मोठे टेबललॅंड म्हणून मसाई पठार ओळखले जाते. गेली काही महिने लॉकडाऊनला कंटाळलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील निसर्गप्रेमी पर्यटकांना सध्या मसाई पाठर खुणावतो आहे. रंगीबेरंगी रानफुले, निसर्ग निर्मित नवरंगांचा उत्सव पहाण्यास हौशी पर्यटक पठाराला भेट देत आहेत. 

सुमारे ९१३ एकरावर पसरलेल्या निसर्गनिर्मित विस्तीर्ण आणि पाचगणीच्या टेबललॅंड पेक्षाही मोठे, नजरेत न मावणाऱ्या मसाई पठाराने अशा या वातावरणात हिरवा शालू परिधान केला आहे. डोंगरदऱ्यांच्या कुशीत विविध जाती, रंगांची छोटी रंगीबेरंगी रानफुले, खोल दऱ्यात उतरणारे ढग, क्षणात निरभ्र होणारे आकाश व कड्यावरून कोसळणारे धबधबे, अंगाला झोंबणारा गार वारा, अधून मधून कोसळणारा पाऊस, हिरव्यागार मऊमखमली पसरलेले गालिच्यावर विविध रंगांच्या रानफुलांचे ताटवे अशी निसर्गाची अनेक रूपांनी मनाला भुरळ पडते. 

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद : कोल्हापुरात गोलमेज परिषदेत निर्णय 

 

सध्या मसाई पठारावर रानफुलांचा हंगाम सुरु असून विविध रंगी फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. गवताच्या गालीच्यावर फुललेली निलवंती (सायनोटीस), सोनकी (सेनिसिओ), केना (कॅमेलीना), कापरु (बिओनिया), रानतेरडा, सीतेचीआसवे (युट्रीक्यूलेरीया), सफेदगेंद (इरीओकोलाँस), सफेदमुसळी (क्लोरोफायटंम), मंजिरी (पोगोस्टीमोनडेक्कननेन्सीस), रानकोथंबीर, रानहळद, नीलिमा (अॅनिलीमा), जंगलीसुरण (सापकांदा), पेनवा, कंदिलफुल (सिरोपेनिया), दिपकाडी (डीपकॅडी), तेरेसा अशी फुले दिसतात. यामध्ये अतिदुर्मिळ देखण्या विविध रंगामुळे वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे पटकन दृष्टीस पडणाऱ्या कंदिलफुलांच्या तीन प्रजाती पठारावर आढळतात. 

अग्निशिका हे नाव सार्थ ठरवणारी कळलावीची पिवळसर लालभडक फुले आणि लहान सुर्यफुलांसारखी दिसणारी सोनकीची गर्दपिवळी फुलांसह पिंडावनस्पतींच्या पांढऱ्याफुलांचे ताटवे मनप्रसन्न करतात. त्याबरोबरच या समूहाने वाढणाऱ्या वनस्पतींची संख्याही जास्त आहे. 

औषधी गुणधर्म सांगणाऱ्या रानकोथंबीर, रानहळद, रानआले यासोबत आकर्षक फुलांनी बहरलेली निळ्यारंगाची भारंगीची झुडपे येथे आढळतात. स्मिथीयाच्या फुलांच्या नऊ प्रजाती पैकी चार ते पाच प्रजाती मसाई पठारावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात.  स्मिथीयाची  फुले पिवळ्या रंगाची असून मोठ्या पाकळीवरील दोन लालभडक ठिपक्यामुळे या फुलांना मिकीमाऊसची फुले म्हणूनही ओळखले जाते. 

हेही वाचा - कोल्हापुरात इतिहासातील घटनांचा स्पर्श झालेले हळदी गाव 

 

या सबंध सौदर्यात भरघालणारी वनविभामार्फत खोदलेली आणि  निसर्गनिर्मित अशी लहान मोठी वीस ते बावीस वनतळी असून या तळयाच्या काठी विविध प्रकारचे कीटक व पक्षी मुक्त विहार करताना दिसतात. या पाणथळ परिसरात सफेद गेंदाच्या लहान फुलांना चेंडू सारख्या गोलाकार मंजिरी येतात यामध्ये गोलगेंद, तारागेंद, पानगेंद अशा दहा प्रजाती आढळतात.

कोल्हापूर पासून अवघ्य तीस किलोमीटरवर वसलेलं मसाई पठार निसर्गप्रेमींना साद घालत आहे. अलीकडेच जिऊर ग्रामपंचायत, वन विभाग आणि  संयुक्त वन व्यवस्थापन समिती जिऊर मार्फत व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क या आधुनिक जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्राची सुरवात झाली आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flowers beauty in masai pathar kolhapur people also enjoyed tourism in this area