...'तोपर्यंत कोयता हातात घेणार नाही'

शिवाजी यादव  
Wednesday, 30 September 2020

कोल्हापूर जिल्हा वाहतूक चालक मालक संघटनेनेच्या चर्चासत्रात आमदार श्री. धस बोलत होते

कोल्हापूर - राज्यात ऊस तोडणी कामगार, वाहतुकदार, मुकादम आदी कामगारांच्या दरवाढ मागणीसाठी संप सुरू आहे. हा संप यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हाती कोयता घेणार नाही तसेच येत्या 5 ऑक्‍टोंबरला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री आमदार सुरेश आण्णा धस यांनी आज येथे दिला. 

कोल्हापूर जिल्हा वाहतूक चालक मालक संघटनेनेच्या चर्चासत्रात आमदार श्री. धस बोलत होते. ते पुढे म्हणाले, कारखानदारांनी चालवलेल्या लुटीमुळे ऊसतोडणी कामगार बेघर झाला आहे. त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. ऊसतोड मजूर हा बीड भागातील आहेत. ऊसतोड मशीनरी आल्याने अनेक ऊसतोड मजूर बेरोजगार झाले आहेत.'' 

एका कोयत्यामागे एका जोडप्याला आपण 50 हजार ते दीड लाख रूपयांची उचल देत होतो. पण मशिनरी आल्यामुळे हे सगळे थांबले आहे. मजूरांचा विमा कारखान्यातर्फे उरविला जातो. परंतु काही अपघात झाल्यास जखमी मजूरांची नुकसान भरपाई कारखानदार हे मुकादम तसेच वाहतूक दारांकडून वसुल करतात. कारखानदारांनी मुकादम आणि वाहतुकदारांची चालवलेलीही एक लुटच आहे, असा आरोपही आमदार श्री. धस यांनी यावेळी केला. 

या चर्चासत्रास वाहतुकदार संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील, श्रीकांत गावडे, बाबा देसाई, बाबासाहेब पाटील, भगवान काटे, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार व वाहतुकदार संघटनेचे तात्यासाहेब हुले, श्रमिक संघटनेचे दत्तोबा भांगे यांच्यासह प्रमुख ऊसतोडणी कामगार, मुकादम, वाहतुकदार उपस्थित होते. 

हे पण वाचाआता चुकीला माफी नाही ; कोल्हापुरच्या नव्या पोलीस अधीक्षकांचा सज्जड इशारा  

शासनाने अनेक कामगारांसाठी लाभदायी कायदे केले. पण ऊसतोड कामगारांच्या बाबतीत कायदे केलेले नाहीत. आपल्यासाठी असा एक हक्काचा कायदा असणे गरजेच आहे. त्यासाठी आपली संघटना स्थापन करण्याची हिच वेळ आहे. त्यानुसार गोपीनाथरावजी मुंडे ऊस तोडणी मजूर मुकादम व वाहतुकदार संघटनेचे कार्य राज्यभर विस्तारत आहेत. हीच संघटना वाढीस लावा, जेणेकरून संघटने तर्फे आपल्या मागण्या शासनदरबारी मांडल्या जातील. असेही धस यांनी सांगितले. 

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former minister mla suresh dhas altimeter to maharashtra government