कार्यकर्त्यांचा हट्ट ५५५५ फिट्ट ; संपत पवार-पाटीलांची गोष्टच न्यारी

Former MLA Sampat Pawar Patil staunch activists of PWD car story by sandeep khandekar
Former MLA Sampat Pawar Patil staunch activists of PWD car story by sandeep khandekar

कोल्हापूर  : संपत पवार-पाटील शेकापचे कट्टर कार्यकर्ते. सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले. ‘बापू’ हे त्यांच टोपण नाव. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झगडण्याचा त्यांचा बाणा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यात मिसळण्यात ते कमी नाहीत. वयाच्या त्र्याहत्तरीतही त्यांची लढाऊ वृत्ती कायम आहे. वीस वर्षांपूर्वीं घेतलेल्या चारचाकीतून त्यांचा गावोगावचा दौरा आजही तुटलेला नाही. त्यांची जनसंपर्काची नाळ घट्ट आहे. त्यांच्या गाडीचा ५५५५ नंबर हा त्यांची ओळख बनलाय. बापू मुळात पुरोगामी विचारांचे. कार्यकर्त्यांच्या हट्टापायी त्यांनी हा नंबर घेतला. घरातील इतर गाड्यांवर तोच आहे. 
 

बापूंचे गाव सडोली खालसा. रा. बा. पाटील महाविद्यालयातून ते अकरावी उत्तीर्ण झाले. राजाराम महाविद्यालयातून त्यांनी बी. ए.ची पदवी मिळवली. चुलते दिनकर पवार-पाटील शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य. अख्ख पवार कुटुंबही शेतकरी वर्गातले. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना जवळून माहीत. न्याय-हक्काच्या प्रश्‍नांवर चुलते नेहमी बोलायचे. शहरासह जिल्ह्यात त्या काळात शेकापचा बोलबाला होता. कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेचा परिसर शेकापचा बालेकिल्ला होता. गावासह शहरात राहिलेल्या बापूंच्या कानावर शेतकऱ्यांचे प्रश्‍न पडायचे.

राजकारणाचे अंग त्यांचे आपोआप तयार झाले. त्यांचे गावात कापड दुकान होते. त्या काळात त्यांनी मोटारसायकल खरेदी केली. कार्यकर्त्यांनी नंबरसाठी ५५५५ ला ग्रीन सिग्नल दिला. भोगावती साखर कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळविण्यात बापूंचे नेतृत्व कामी आले. १९७३ ते ७८ व १९८५ ते ८९ दरम्यान कारखान्यावर त्यांचा करिश्‍मा राहिला. उत्कृष्ट राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांच्या उदयाचा हा काळ होता. 


पुढे जनसंपर्काचा वेग वाढविण्यासाठी १९९० मध्ये जीपची खरेदी झाली. तिच्याकरिता ५५५५ नंबर फायनल झाला. बापू १९९५ ला निवडणूक रिंगणात उभे राहिले. विजयाचा गुलाल त्यांच्या अंगावर पडला. दोन वर्षे जीपमधूनच त्यांचा मतदारसंघात दौरा होता. मग त्यांच्या सोबतीला सुमो आली. कार्यकर्त्यांनी ५५५५ नंबर कायम ठेवण्याची शिफारस केली. अधिवेशनाला जाताना गाडीचा कुर्डू-बार्शी मार्गावर अपघात झाला. गाडीचे नुकसान झाले. गाडी न वापरण्याची विनंती बापूंकडे झाली. ती दुरुस्त करून बापूंनी वापरली. 


बापूं १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा विजयी झाले. सुमो गाडीची कुरकूर सुरू झाल्याने बोलेरोची खरेदी झाली. वीस वर्षे हीच गाडी बापूंच्या सोबतीला आहे. तिप्पट पाणीपट्टी, वीज दरवाढ, करवाढविरोधासह ऊस दरवाढ, दूध दरवाढीच्या समर्थनाथ कोणतेही आंदोलन असो, त्यांचा पुढाकार असतो. त्यांचे धाकटे बंधू मोहन पवार यांच्या बुलेटचा ५५५५ नंबर आहे. क्रांतिसिंहची जीप व करिझ्माचाही तोच नंबर आहे. बापू म्हणतात, ‘‘कार्यकर्ते नेत्यावर जीवापाड प्रेम करणारे असतात. त्यांच्या काही गोष्टी ऐकाव्या लागतात. माझ्या गाडीचा नंबर त्यांच्या प्रेमापोटीच नंबर प्लेटवर लिहिला गेलाय. तोच नंबर घेण्याचा त्यांचा आग्रह असतो.’’

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com