कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न 

लुमाकांत नलवडे
Tuesday, 26 January 2021

 रस्ताला वहिवाट मिळत नाही म्हणून आर.के.नगरातील भालकर कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

कोल्हापूर :  रस्ताला वहिवाट मिळत नाही म्हणून आर.के.नगरातील भालकर कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेत असतानाच शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गोपणीय विभागाच्या पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. यामुळे पुढील अनर्थ टळला. प्रशासनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहन समारंभ शाहू मैदान मध्ये होत असतानाच भालकर कुटुंबियांना जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रयत्न केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी सांगितले, की यशवंत भालकर, मुलगा उमाजी यशवंत भालकर, भाऊ मारुती गणपती भालकर, संगीता भालकर, स्वाती भालकर आणि कांचन भालकर अशी आत्मदहन करण्यासाठी आलेल्यांची नावे आहेत. यशवंत भालकर हे 86 वर्षाचे आहेत. शांतादुर्ग कॉलनी, आर.के.नगर येथे राहतात. त्यांनी रस्त्याच्या वहिवाटीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यांच्या प्रकरणांची चौकशी झाली. पुढे सुनावणी झाली आणि त्यामध्ये त्यांच्या विरोधात निकाल झाला आहे. हा निकाल अमान्य असल्यामुळे त्यांनी आज प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. 

हेही वाचा- तिलारीचा डावा कालवा फुटला, खानयाळेत हाहाकार

सकाळी हे कुटुंबिये रिक्षातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यत आले. तेथे त्यांनी रॉकेल कॅनमधून अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दक्षता म्हणून शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गोपणीय शाखेचे प्रमुख सुनील जवाहीरे, साजीद गवंडी आणि एकनाथ भांगडे हे तेथे उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राहून सर्वांनाच आत्मदहन करण्यापासून रोखले. याठिकाणी पोलिस आणि त्यांच्यात झटापट झाली. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहन सकाळी लवकर झाल्यामुळे तेथे इतर अधिकारी कोणीही उपस्थित नव्हते.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four members attempt suicide in collector office kolhapur