7899 हाच नंबर ठरला ॲड. शिंदे यांच्यासाठी विजयाची निशाणी

four wheeler car number special story of ad shirpatrao shinde in kolhapur
four wheeler car number special story of ad shirpatrao shinde in kolhapur

कोल्हापूर : ॲड. श्रीपतराव शिंदे जनता दलाचे कट्टर कार्यकर्ते. राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आजही आहे. शिक्षक, वकील ते राजकारणी असा त्यांचा प्रवास. अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याचे ते अध्यक्षही राहिले. वकिली करताना शेतकऱ्याच्या बांधावर पोचलेले हे व्यक्तिमत्त्व. जनता दलाच्या माध्यमातून गावकऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. त्यांच्याकडे गेल्यावर प्रश्न सुटणार, अशी हमी लोकांत बळावली. राजकारणाच्या आखाड्यात त्याचा त्यांना पुरेपूर उपयोग झाला. दोन वेळा गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. पहिल्या निवडणुकीपूर्वी जावा मोटरसायकल क्रमांक ७८९९ वरून त्यांनी गावे धुंडाळली. हा नंबर घेण्यामध्ये खास कारण नव्हते. केवळ आरटीओकडून मिळाला आणि तो नंबर प्लेटवर रंगवला गेला इतकेच.  

ॲड. शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण नूलमध्ये झाले. त्यांनी १९५९ मध्ये बी. ए. पूर्ण केले. शिक्षकी पेशा त्यांना नको होता. तरीही कोकणातील देवबाग व गडहिंग्लज तालुक्‍यातील हलकर्णीच्या शाळेत प्रत्येकी दोन वर्षे ते शिक्षक राहिले. वकिलीचा अभ्यास मात्र त्यांनी सुरू ठेवला. तो पूर्ण झाल्यावर ते गडहिंग्लजला परतले. ॲड. डी. डी. वर्धमाने या स्वातंत्र्यचळवळीत योगदान दिलेल्या व्यक्तिमत्त्वाशी त्यांचा सहवास घडला. वर्धमाने समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वकिली सुरू झाली. गडहिंग्लजच कार्यक्षेत्र करण्याचा शिंदे यांचा मानस होता. जनता दलाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आकाराला आली.

जनसंपर्कासाठी १९६९ मध्ये त्यांनी जावा गाडी खरेदी केली. या गाडीवरून त्यांचा गावागावांत संपर्क सुरू झाला. शेतमजूर संघटनेची बांधणी करण्यासाठी गाडी महत्त्वाची ठरली. ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे व आर. बी. शिंदे यांनी त्यांना मोलाची साथ दिली. ते १९८५ च्या निवडणुकीत विजयी झाले. दुचाकीवरून संपर्क करणे शक्‍य नव्हते. लोक वर्गणीतून ५५ ते ६० हजार रुपयांची रक्कम जमा झाली. जीपची किंमत एक लाख होती. उर्वरित पैशासाठी बॅंकेचे त्यांना कर्ज काढावे लागले. गाडीचा नंबर ९४९९ हा घेतला गेला. पुढे सावंतवाडीतून मारुती कारची खरेदी झाली. ती ट्रान्स्फर करताना गाडीचा नंबर ७८९९ घेतला.

ज्येष्ठ बंधू ए. डी. शिंदे यांनी त्यांच्यासाठी चारचाकीची खरेदी केली. सुदैवाने या गाडीचा क्रमांकही ७८९९ असा होता. त्यानंतरच्या काळात मात्र शिंदे कुटुंबीयांत खरेदी झालेल्या प्रत्येक गाडीवर ७८९९ क्रमांक घेण्यात आला. हा नंबर निवडणुकीतील विजयाची निशाणी मानली गेली. शिंदे यांच्या कन्या नगराध्यक्ष स्वाती कोरी यांची राजकीय वाटचाल वडिलांच्या पावलावर आहे. त्यांच्या गाडीचा नंबरही वडिलांनी घेतलेल्या पहिल्या गाडीसारखाच आहे. शिंदे म्हणाले, ‘नूलचे नातलग सावंत यांनी आमची जुनी गाडी विकत घेतली आहे. ती चकचकीत ठेवून तिचा क्रमांकही तोच ठेवला आहे. साधना विद्यालयातील बाळासाहेब पाटील यांनी आमच्या नंबरला पसंती देऊन त्यांच्या गाडीसाठी हाच क्रमांक घेतलाय.'

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com