लाॅकडाऊनच्या काळात तब्बल एवढ्या मुलींनी सोडले घर  

राजेश मोरे  
Wednesday, 16 September 2020

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

कोल्हापूर - साहेब थोडं नाजूक प्रकरण आहे, आमच्या मुलीला फूस लावून पळवून नेले, तिला अजून काही समजत नाही, प्लीज तिला शोधून काढा, अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या पालकांची संख्या लॉकडाउन काळातही कमी झालेली नाही. सहा महिन्यांत तब्बल 58 हून अधिक मुली पळून गेल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत झाली आहे. 

आज परिवारातील संवाद हरपत चालला आहे. शालेय वयातच मुलांच्या हाती मोबाईल आले. फिल्मी स्टाईल, टवाळखोरांच्या अनुकरणाने नको त्या गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडू लागल्या. एकीकडे पालक मुलांच्या करिअरसाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यांना चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये घालतात. उच्च शिकवणी, मोबाईल, लॅपटॉपसह मोपेड मोटारसायकल, असे काहीही कमी पडू देत नाहीत. मुले नेमकी मोबाईल, लॅपटॉपवर काय करतात? ती कोणत्या मित्र-मैत्रिणींच्या संगतीत आहेत, याकडे मात्र पालकांचे होणारे दुर्लक्ष, हेच मुली पळून जाण्याचे अथवा पळवून नेण्याचे कारण समोर आले आहे. 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मुली पळून जाण्याच्या तपासात जर मुलगी अल्पवयीन असेल, तर थेट अपहरण अशी नोंद होते. त्यानुसार तिचा शोध घेतला जातो. ज्याने हे कृत्य केले त्याच्यावर "फोक्‍सो'अंतर्गत कारवाई केली जाते. 

पळून गेलेल्या बहुतांशी मुली या सज्ञान होण्याच्या उंबरठ्यावर असतात. सज्ञान झाल्यानंतर त्या लग्न करूनच थेट पोलिस ठाण्यात हजर होण्याचे प्रमाण अधिक आहे. 

कोरोनाचे संकट सुरू झाले तसा लॉकडाउन लागू झाला. प्रत्येक कुटुंब घरातच होते. तरीही त्या कुटुंबातील मुलीला पळवून येणे अगर ती पळून जाण्याचे प्रमाण मात्र काही थांबले नाही. हे पोलिस ठाण्यातील नोंदीवरून स्पष्ट झाले. शाळा, महाविद्यालय बंद असल्याने निर्भया पथकाकडून होणारे समुपदेशनही थांबले आहे. 

हे पण वाचाकोल्हापुरातील मराठा आंदोलन भरवणार शासनाला धडकी

 पालकांनी सु-संवादातून मुलांचे मित्र बनावे. चांगल्या-वाईट गोष्टींची त्यांना जाण करून द्यावी. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीचा भडिमार न करता त्यांना समजून घ्यावे. 
- पौर्णिमा कोठावळे, जिल्हा माहिती समुपदेशन केंद्र. 

हे पण वाचा - 7899 हाच नंबर ठरला ॲड. शिंदे यांच्यासाठी विजयाची निशाणी 

 
लॉकडाउन काळात मुली पळून जाण्याचे प्रमाण... 
महिना दाखल गुन्हे उघड गुन्हे 
 मार्च 9 5 
 एप्रिल 5 2 
 मे 8 5 
 जून 12 5 
 जुलै 10 3 
 ऑगस्ट 14 8 
 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 58 girls from Kolhapur left home During lock down