"गोकुळ' ची प्रक्रिया सुरूच राहणार; न्यायालयातील याचिका मागे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 March 2021

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 24 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे कारण देत सलग सहाव्यांदा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली.

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज संघाने मागे घेतली. त्यामुळे संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू रहाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता अंतिम मतदार यादीनंतर प्रत्यक्ष अर्ज भरणे आणि मतदानाच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे राजकीय क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत. 

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 24 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे कारण देत सलग सहाव्यांदा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली. तथापि शासनाच्या 4 फेब्रुवारीच्या आदेशाविरोधात काही संस्था उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यात "गोकुळ' ची प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. यावरील निर्णय 10 फेब्रुवारी रोजी देताना न्यायालयाने तातडीने प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. 24 फेब्रुवारीच्या आदेशात ज्या प्रकरणात उच्च व सर्वोच्च न्यायालयाने प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार "गोकुळ' ची प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. 

प्राधिकरणाच्या या निर्णयाला "गोकुळ' च्यावतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. कोरोनामुळे इतर संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती असताना "गोकुळ' चीच प्रक्रिया का सुरू ? अशी विचारणा यात करण्यात आली होती. यावर आज सुनावणी होती, पण सुनावणी सुरू होण्यापुर्वीच "गोकुळ' ने ही याचिका मागे घेतली. त्यामुळे संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. काही संस्थांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी "गोकुळ' च्या पातळीवर सुरू होती, पण 31 मार्चपर्यंतच निवडणुकांना स्थगिती आहे. तत्पुर्वी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होऊन प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू व्हायला एप्रिल महिना उजाडणार आहे, त्यामुळे ही याचिका दाखल करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे समजते. 

हे पण वाचा शाळा सुरूच राहणार; माध्यमिक शिक्षणाधिकारी

आम्ही निवडणुकीला तयार-पी. एन. पाटील 
कोरोनामुळे राज्यातील सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. जिल्ह्यातील एक हजार संस्थांच्याही निवडणुका पुढे गेल्या. त्या संस्थांबरोबर आम्हालाही न्याय मिळावा या भुमिकेतून न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण आता महिनाभरच स्थगिती आहे म्हणून ही याचिका मागे घेतली. आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत, त्यासाठी सगळ्यांशी चर्चा करण्याची तयारी आमची असल्याचे संघाचे सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांनी "सकाळ' ला सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gokul milk factory election kolhapur