कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने गोकुळ शिरगाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

संसर्गित व्यक्ती गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील गोकुळ दूध संस्थेच्या दूध वाहतूक कंत्राटदाराच्या टँकरवर कार्यरत होती.

उजळाईवाडी (कोल्हापूर) - गोकुळ शिरगाव ता.करवीर येथील एका 45 वर्षीय गोकुळ दूध टँकर चालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गोकुळ शिरगाव परिसरामध्ये खळबळ माजली असून ग्राम समिती व पोलिस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून सील करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संसर्गित व्यक्ती गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील गोकुळ दूध संस्थेच्या दूध वाहतूक कंत्राटदाराच्या टँकरवर कार्यरत होती. सदर टँकरद्वारे मुंबईस नियमित दूध पुरवठा केला जात असून सदर चालक 13 मे पासून आजारी असल्याचे समजते. तीन मे ते 13 मे दरम्यान या व्यक्तीने गावातील व उंचगाव येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेतले होते.13 तारखेस डॉक्टरांच्या सूचनेवरून सीपीआरमध्ये दाखल झाल्यानंतर आज सकाळी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा संदेश मिळाला. त्यानंतर तातडीने ग्राम समिती व गोकुळ शिरगाव पोलिस यांच्यावतीने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून संपूर्ण गाव बंद करण्यात आले आहे . मेडिकल,किराणा,भाजीपाला यासह सर्वच दुकाने बंद केली असून नागरिकांनी तीन दिवस घराबाहेर न पडण्याचे आवाहन गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व सरपंच महादेव पाटील यांनी केले आहे.

वाचा - विपरीतच घडलं ! तिने सायरनचा आवाज ऐकला अन् तिच्या जिवाच झालं वाईटच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gokul Shirgaon declared a restricted area after finding a corona positive