कन्नडसक्‍ती आंदोलनातील हुतात्मांना सोमवारी अभिवादन...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

1 जून 1986 रोजी कर्नाटक सरकारने संपूर्ण सीमाभागात कन्नडसक्‍ती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कन्नडसक्‍ती विरोधात सीमाभागात संतापाची लाट उसळली. समितीच्या आवाहनानुसार आंदोलन सुरू असताना कर्नाटकी पोलिसांनी अत्याचाराची परिसीमा गाठत गोळीबार केला. यामध्ये 9 हुतात्मे झाले.

बेळगाव - सीमाभागामध्ये कर्नाटक सरकारने 1 जून 1986 साली कन्नड सक्ती लागू केली. त्यामुळे सीमाभागात अभुतपुर्व आंदोलन करण्यात आले तसेच संपूर्ण सीमाभागात कर्नाटक सरकार विरोधात संतापाची लाट उसळली होती यावेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारच्या अत्याचारी पोलिसांनी बेछुट गोळीबार केला. यामध्ये 9 हुतात्मे धारातीर्थ पडले होते. या हुतात्मांना सोमवार ता. 1 जून रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 8 वाजता हुतात्मा स्मारक बॉक्‍साईट रोड, हिंडलगा येथे मोठ्‌या संख्येने हजर रहावे असे आवाहन शहर म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले.

आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन

1 जून 1986 रोजी कर्नाटक सरकारने संपूर्ण सीमाभागात कन्नडसक्‍ती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कन्नडसक्‍ती विरोधात सीमाभागात संतापाची लाट उसळली. समितीच्या आवाहनानुसार आंदोलन सुरू असताना कर्नाटकी पोलिसांनी अत्याचाराची परिसीमा गाठत गोळीबार केला. यामध्ये 9 हुतात्मे झाले. त्यांचे हौतात्म वाया जाऊ नये याची दखल मराठी भाषिकानी घेत सीमावासीनी मराठी भाषेचे, संस्कृतीचे रक्षण करताना प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्‌या संख्येने उपस्थित रहावे तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर राखून गांभीर्याने हुतात्मा दिन पाळावा असे आवाहन शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींनी आवाहन केले आहे.

वाचा - कर्नाटक राज्यात पावणे दोनशे जणांना कोरोनाची लागण

हुतात्मा दिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली असुन दोन दिवसात इतर आवश्‍यक कामे पुर्ण केली जाणार आहेत. शहर समितीबरोबरच तालुका म. ए. समिती, खानापूर तालुका समिती, म. ए. युवा समिती आदींतर्फे हुतात्मा अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

व्हॉटसऍप, फेसबुक आदींवर हुतात्मा दिनाबाबत जनजागृती

एक जुन हुतात्मा दिनाबाबत सोशल मिडीयावरुन मोठ्‌या प्रमाणता जनजागृती केली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असुन हुतात्मांचे बलीदान आठवा आणी सीमाप्रश्‍नासाठी कटिबध्द व्हा असे आवाहन युवा वर्गाकडुन केले जात आहे. व्हॉटसऍप, फेसबुक आदींवर हुतात्मा दिनाबाबत जनजागृती सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greetings to the martyrs of Kannada Sakti movement on Monday