माझे कुटुंब, माझी जबाबदारी ; ९ लाख घरांत सर्वेक्षण , कोरोनाच्या प्राथमिक लक्षणावर तातडीने उपचार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पालकमंत्री पाटील; सातनंतरही कर्फ्यू कडकपणे पाळा

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे, शहरातील नागरिकांनी सायंकाळी सातनंतरही जनता कर्फ्यू कडकपणे पाळावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. जिल्ह्यात आजपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे सर्वेक्षण सुरू होत आहे. या मोहिमेद्वारे ग्रामीणमधील ७ लाख ६६ हजार आणि शहरातील १ लाख ३१ हजार घरांमध्ये जाऊन सर्व्हे केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना असून राज्यातील ज्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यांना तातडीने उपचार करता येईल, यासाठी १४ सप्टेंबर ते २४ ऑक्‍टोबरपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. सहा महिन्यांपासून कोरोना संसर्गाशी लढा दिला जात आहे. आता, चेस द व्हायरस यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्व्हे केला जाणार आहे. ज्यांना लक्षणे आणि किंवा अत्यवस्थ आहेत. अशा रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार केले जातील. 

 हेही वाचा- हिंदी दिन विशेष : मन, पोटही भरवते हिंदी भाषा -
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘शासनाकडून कोरोना रुग्ण तपासणीसाठी सुुरू केली जात असलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी, या मोहिमेचा निश्‍चितपणे फायदा होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. तसेच आपल्या घरातील व्यक्ती ताप, खोकला किंवा कोरोना सदृश लक्षणे असल्यास निश्‍चितपणे सांगितले पाहिजे.’ 
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, ‘या मोहिमेत सार्वजनिक मंडळ, स्वयंसेवी संस्था, तालीम मंडळे, बचतगट सहभाग घेऊ शकतात.’ यावेळी, महापौर निलोफर आजरेकर, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

 हेही वाचा-सहा जणांनी रचला कट :  वर्चस्व वादातूनच तो हल्ला , तरूण गंभीर जखमी

 

६४ कोटींच्या निधीचा असा होणार वापर 
६४ कोटींच्या निधीतून जिल्ह्यात अतिदक्षता विभागातील बेड संख्या वाढवली जाणार आहे. यासाठी, सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील, इचलकरंजी येथील आयजीएम, गडहिंग्लज व घोडावत इन्स्टिट्यूट येथे याचे नियोजन केले आहे. स्वॅबचा अहवाल लवकरात लवकर दिला जाणार असल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले. 
 

अशी होणार तपासणी  
  घरांची संख्या     ७ लाख ६६ हजार  
  लोकसंख्या     ३३ लाख २४ हजार ३९२
  सर्व्हे पथकांची संख्या     २ हजार ८७८ 
  या पथकांमधील सदस्यांची संख्या     ३ हजार ८३४
  प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या    ८१

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guardian minister satej patil press conference in kolhapur Survey of 9 lakh households from today