जनजागृतीत कोल्हापूरचे प्रभावी काम ; रेमडेसिवीरसह अन्य सामग्री दोन दिवसात : पालक सचिव राजगोपाल देवरा

निवास चौगले
Monday, 28 September 2020

मुख्यमंत्री महोदयांनीही मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली.

कोल्हापूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे जागोजागी लावलेले फलक आज पाहिले. मुख्यमंत्री महोदयांनीही मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे, अशा शब्दात गौरव करुन जिल्ह्याने नोंदविलेल्या मागणीनुसार दोन दिवसात रेमडेसिवीरसह अन्य आरोग्य सामग्री पुरविली जाईल, अशी ग्वाही त्यांनी आज दिली.

पालकसचिव श्री. देवरा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड 19 उपाययोजना बाबत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रभारी पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार उपस्थित होते.

पालकसचिव श्री. देवरा म्हणाले, सध्या बाधित रुग्णांची संख्या कमी दिसत असून कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये विशेष: बाधित रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये विशेष लक्ष द्या. प्रभावी सर्वेक्षण करण्यावर अधिक भर द्या. त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. मास्क वापरण्याबाबत कोल्हापूर जिल्हात जनजागृतीचे चांगले काम होत आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दंड करण्यात येत आहे. ही चांगली बाब आहे. यामधून मास्क वापरला पाहिजे हा संदेश सर्वत्र पोहचेल.

हेही वाचा- ‘माझे कुटुंब’ मोहिमेपासून गावातील नेते चार हात लांबच -

खासगी रुग्णालय, प्रयोगशाळेत एचआरसीटीबरोबरच स्वॅब देखील घेतला जावा यासाठी सर्वांना सूचना द्याव्यात. वयाच्या 60 वर्षापुढील सर्वांची तपासणी करावी त्याचबरोबर सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींचीही तपासणी करावी, असेही ते म्हणाले.
आरोग्य प्रधान सचिव,वैद्यकीय शिक्षण सचिवांशी फोनवरुन चर्चा
पालक सचिव श्री. देवरा यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी बैठकीमधून फोनवरुन संपर्क साधला. एसडीआरएफमधून मिळणाऱ्या निधीबाबत, रेमडेसिवीर, आरटीपीसीआर किट, आरएनआय एक्सट्रॅक्शन किट, ॲन्टिजन किट आदीबाबत चर्चा केली. त्याचबरोबर प्रभारी पोलीस अधिक्षक श्री. काकडे यांच्याकडून बाधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी माहिती घेतली. जिल्ह्याने नोंदविलेली मागणी दोन दिवसात पुरविली जाईल त्याचबरोबर मागणीनुसार आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही श्री. देवरा म्हणाले.

हेही वाचा- Kolhapur CPR Fire Update :  आगीत चार जणांचा मृत्यू -

जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी जिल्ह्याचा सविस्तर आढावा दिला. मास्क नसेल तर दुकानदाराने ग्राहकाला परत पाठविले पाहिजे आणि दुकानदाराने मास्क घातला नसेल तर ग्राहक परत जाईल. यामुळे मास्क वापरला जाईल यासाठी मास्क नाही तर प्रवेश नाही हा उपक्रम राबवत असल्याची त्यांनी सांगितले. खासगी प्रयोग शाळांकडून एचआरसीटीचा अहवाल दररोज मागवण्यात येतो त्यानुसार वैद्यकीय पथके पाठपुरावा करुन तपासणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

रस्त्यावर थुंकल्यामुळे 500 रुपयांचा दंड केल्याचे सांगून महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी  म्हणाले, महापालिकेच्या माध्यमातून आजवर 50 लाख रुपये दंडाची रक्कम गोळा झाली आहे. जनजागृती विशेषत: लोकशिक्षण यावर भर देण्यात येत आहे. श्री. मित्तल यांनीही यावेळी जिल्ह्यातील कोव्हीड रुग्णालये, केंद्रांना पुरविण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन, अन्य आरोग्य विषयक साधनसामग्री याबाबत माहिती दिली. 1 ऑक्टोबर पासून इली, सारी आणि सहव्याधी व्यक्तींसाठी आरोग्य शिबीराचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, शहर आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Secretary Shri. Deora held a review meeting on Covid 19 measures at the Collectorate kolhapur