तोफेची सलामी आणि‌ घटस्थापना...! करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ

संभाजी गंडमाळे
Saturday, 17 October 2020

ललित पंचमी असून श्री अंबाबाई परंपरेप्रमाणे टेंबलाई देवीच्या भेटीस जाईल. यंदा हा सोहळा सुध्दा साध्या पध्दतीने होणार आहे.  

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी नऊच्या सुमारास तोफेची सलामी दिल्यानंतर श्रीपूजक शेखर मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर, सुहास जोशी, किरण लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना झाली. 

दरम्यान, ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरासह शहरातील नवदुर्गा मंदिरातही घटस्थापना पारंपरिक उत्साहात झाली. यंदा भाविकांविना उत्सव होणार असला तरी सर्व धार्मिक विधी मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. श्री अंबाबाईच्या लाईव्ह दर्शनासाठी शहरातील दहा ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन उभारण्यात आले आहेत. त्याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संकेतस्थळाबरोबरच सर्व डिजीटल प्लॅटफॉर्मवर देवीचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. 

हेही वाचा- सनई, तुतारी, ढोल, ताशाच्या निनादात दख्खनचा राजा श्री . जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास प्रारंभ - 

उत्सवकाळात श्री अंबाबाईच्या नऊ दिवस नऊ सालंकृत पूजा बांधल्या जाणार आहेत. सलग नऊ दिवस लाल, पितांबरी, निळा-जांभळा, लाल, पांढरा सोनेरी काठ, पिवळा, लाल अशा रंगांच्या साड्या देवीला परिधान केल्या जातील. आज पहिल्या दिवशी देवीची कुण्डलिनी रूपात सालंकृत पूजा बांधली जाणार आहे. बुधवारी (ता.21) ललित पंचमी असून श्री अंबाबाई परंपरेप्रमाणे टेंबलाई देवीच्या भेटीस जाईल. यंदा हा सोहळा सुध्दा साध्या पध्दतीने होणार आहे.  

संपादन - अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gun salute and starting Navratri festival begins at Ambabai temple kolhapur