रंकाळयावर झाडांचा "हॅप्पी बर्थडे..'

"Happy Birthday to the trees on Rankalaya
"Happy Birthday to the trees on Rankalaya

फुलेवाडी :  "सकाळ' माध्यम समूहाच्या "चला झाडे लावू या...' या उपक्रमाच्या माध्यमातून रंकाळ्यावर लावलेल्या झाडांचा आज नववा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. रंकाळा चौपाटीवरील झाडाला जरीचा फेटा बांधण्यात आला. रंगीबेरंगी फुगे, पताका लावून, केक कापून रंकाळा प्रेमींनी सोशल डिस्टन्स ठेवत "हॅप्पी बर्थडे टू यू..' म्हणत झाडांचा वाढदिवस साजरा केला. रंकाळा प्रेमी व हिंदू युवा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

"सकाळ'च्या प्रेरणेने 12 जून 2011 रोजी रंकाळ्यावर दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर दरवर्षी वृक्ष लागवड व संवर्धन केले जाते. अनेक वृक्ष फळा-फुलांनी बहरलेले आहेत. विविध जातीचे पक्षी या झाडावर बागडतात. आता रंकाळा पक्षीतीर्थ बनला आहे. आजही पक्ष्यांच्या अधिवासास उपयोगी अशी झाडे लावण्यात आली. 
यावेळी "सकाळ' माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले,""रंकाळा प्रेमी लोकांच्या आंतरिक ऊर्जेमुळे वृक्ष लागवडीची मोहीम लोक चळवळ बनून यशस्वी झाली. "सकाळ'च्या विधायक उपक्रमांना लोकांनी मनापासून साथ दिली. रंकाळा जतन व संवर्धन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. यापुढे आपले सामाजिक जीवन, कौटुंबिक आयुष्य स्वच्छता व पर्यावरण पूरकच असायला हवे. रंकाळा परिसरात पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या अनेक गोष्टींना यापूर्वी लोकांनी ताकतीने विरोध केला आहे.'' 

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले,""पर्यावरण पूरक शहर म्हणून राज्यात कोल्हापूर एक नंबरला राहील. पर्यावरण संवर्धन हा चिरस्थायी विकास आहे, कोल्हापूरकर पर्यावरण संवर्धनासाठी जागरुक आहेत. सामाजिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिक पुढे येतात ही फार महत्वाची बाब आहे.'' 
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले,""नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत सकाळ'ने वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी केली. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी "सकाळ' नेहमीच राहिला आहे.'' 

माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले,""झाडे लावून हा उपक्रम थांबला नाही तर ती झाडे आपलेपणाने रंकाळा प्रेमींनी जगवली आहेत. त्यामुळे "सकाळ'ची झाडे लावा.. ही मोहीम फारच यशस्वी झाली.'' 

हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई प्रास्ताविकात म्हणाले,""सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सकाळ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. रंकाळा परिसरात हिरवाई बहरण्यासाठी "सकाळ'चा सहकार्य मोठे आहे.'' 

याप्रसंगी "सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, संजय शिंदे, पवन जामदार, यशवंत पाटील, महेश इंगवले, राजेंद्र सूर्यवंशी, नंदकुमार पोवार, श्रीकांत थोरात, सुनील हराळे, शिवाजी पाटील, रवी भोईटे, मेदिनी गोकाक, सौ. सरनाईक आदी रंकाळा प्रेमी उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. डॉ. अमर आडके यांनी आभार मानले. 

वृक्षमित्रांचा सत्कार.. 
रंकाळा परिसरात हिरवाई बहरण्यासाठी योगदान देणारे रंकाळा प्रेमी वृक्षमित्र श्रीकांत कदम, सुधीर गांधी, अजित मोरे, सुभाष हराळे, राजशेखर तंबाके, विजय औंधकर, विकास जाधव, प्रा. एस. पी. चौगुले, विक्रम कुलकर्णी, किसन चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. 

दृष्टिक्षेप 
- "सकाळ'तर्फे पक्ष्यांच्या अधिवासास उपयोगी झाडे लावली 
- रंकाळप्रेमींकडून झाडांची जपणूक 
- झाडाला जरीचा फेटा बांधण्यात आला 
- वृक्ष लागवडीची मोहीम लोक चळवळ बनून यशस्वी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com