तमनाकवाड्यातील तरुणाची ही आहे `गरुड भरारी`

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

भारतीय हवाई दलाच्या "गरुड कमांडो' या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या विभागासाठी देशातील केवळ महाराष्ट्र, झारखंड, सिक्कीममधून कणखर तरुणांना संधी दिली जाते.

सेनापती कापशी (जि. कोल्हापूर) : वडील टेम्पोचालक. श्रमगंगेला प्रसन्न करीत राबणाऱ्या वडिलांना साक्षी ठेवूनच पोरगा हवाई दलात जाण्याचे स्वप्न पाहत होता. स्वप्न पाहणं सोपं असतं. ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी तितकीच मेहनत लागते, याची जाणीव त्याला होती. त्याच जिद्दीने तो परीक्षेला सामोरा गेला आणि देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तमनाकवाडा (ता. कागल) येथील तेजस रघुनाथ शिंत्रे याची ही यशोगाथा. दरम्यान, तेजस सध्या देवचंद महाविद्यालयात बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात आहे. त्याची ही गरुडभरारी परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. 

तेजस येथील रानडे विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला ते सुद्धा 90 टक्‍क्‍यांसह. बारावीला विज्ञान शाखेतून त्याने विशेष गुणवत्ता मिळवली आणि पदवी शिक्षणासाठी तो देवचंद महाविद्यालयात आला. याच दरम्यान त्याने हवाई दलाच्या परीक्षेचीही जोरदार तयारी सुरू केली आणि बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच यश खेचून आणले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे तो कुठलाही खासगी क्‍लास लावू शकत नव्हता. त्याने स्वयंअध्ययनावरच भर दिला. भारतीय हवाई दलाच्या "गरुड कमांडो' या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या विभागासाठी देशातील केवळ महाराष्ट्र, झारखंड, सिक्कीममधून कणखर तरुणांना संधी दिली जाते. त्यामध्ये प्रत्येक वर्षी 174 तरुणांची निवड होते. जुलै 2019 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तेजसने त्यात देशात आठव्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकासह बाजी मारली आहे. 

 हे पण वाचा - ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय चांगला असला, तरीही राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप तंत्रज्ञान पोचलेले नाही.

घरात आनंदाचे भरते... 
तेजसच्या यशाची माहिती मिळताच त्याच्या घरात आनंदाचे भरते आलेच; शिवाय मित्र परिवार आणि ग्रामस्थांनी फटाक्‍यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा केला. कष्टाळू वडील आणि मितभाषी तेजसलाही यावेळी आनंदाश्रू लपवता आले नाहीत. 

``यशाची माझी पहिली पायरी आहे. एवढ्यावर न थांबता हवाई दलातील उच्च पदावर काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी ज्या ज्या परीक्षा द्याव्या लागतील, त्या मी देतच राहणार आहे.`` 
- तेजस शिंत्रे 

 हे पण वाचा - तुम्हाला परीक्षेचा ताण आलाय? परीक्षेची तयारी कशी करावी, यासाठी टिप्स हव्यात का? वाचा सविस्तर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He ranked 8th in air force exams