कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान

राजू पाटील
Tuesday, 20 October 2020

बारानंतर पावसाचे वातावरण दिसून आले आणि अचानक दुपारी सव्वा एक वाजल्यापासून पावसाने धुवाधार सुरुवात केली

राशिवडे  बुद्रुक : आज दुपारी येळवडे, पुंगाव. शिरगाव आणि धामोड परिसरामध्ये अक्षरश: ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. केवळ 70 मिनिटात या परिसरात 110 मिलिमीटर पाऊस झाला. अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. पावसाची आक्रमकता पाहून तुळशी धरणातून 749 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करणे भाग पडले. अचानक आलेल्या पावसामुळे  भांबेरी उडाली. भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

 सकाळपासून उघडीप होती. मात्र बारानंतर पावसाचे वातावरण दिसून आले आणि अचानक दुपारी सव्वा एक वाजल्यापासून पावसाने धुवाधार सुरुवात केली. अर्धा तास अक्षरशः पावसाने झोडपून काढले. पाणीच पाणी झाल्याने लोकांची  त्रेधातिरपीट उडाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

येळवडे येथे महालक्ष्मी कापड दुकान आणि किराणामाल दुकानासह ग्रंथालयांमध्ये पाणी गेल्याने सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. पुंगाव, शिरगाव परिसरातही प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने कापणी योग्य झालेल्या भाताला फटका बसला आहे. तर कापणी केलेले भात अर्ध्यावर टाकून शेतकऱ्यांना शिवारातून बाहेर येणे भाग पडले.

हे पण वाचाब्रेकिंग - अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा स्थगीत

धामोड परिसरातील तुळशी धरण क्षेत्रावर झालेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रातून प्रचंड ओघ आला आणि धरणामध्ये पाणी वाढू लागल्याने या धरणातून 749 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. या परिसरात 70 मिनिटात 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हे पण वाचा - 'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार' 

येळवडे येथील धनाजी कांचनकर यांच्या कापड दुकानात पाणी शिरल्याने सुमारे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले. येथील कैलास सरवळकर यांच्याही दुकानात पाणी शिरले. ओम शिव गोरक्ष सार्वजनिक ग्रंथालयात पाणी शिरले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे नुकसान झाले आहे. तलाठी शहाजी चिंदगे यांनी भेट देवून पाहणी केली.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in kolhapur desert farmer crops Damage