असा पोहोचविला जात आहे ग्राहकांपर्यंत मावा ; आधी पैसे, मग पुडी

 home delivery mawa kolhapur
home delivery mawa kolhapur

कोल्हापूर : संचारबंदी काळातही कोल्हापूर शहराबरोबरच उपनगरांमध्ये माव्याची आणि गुटख्याची जोरदार विक्री चालली आहे. अशातच नेहमी छुप्यापद्धतीनेच विक्री केल्या जाणाऱ्या या माव्याचा आणि गुटख्याच्या पुडीचा भाव आणखीनच वधारला आहे.

संचारबंदीत तंबाखूजन्य पदार्थांचा जीवनावश्‍यक वस्तूत सहभाग नसल्यामुळे या मावा खाणाऱ्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे. याचा गैरफायदा मात्र काही विक्रेते पानपट्टी संघटनेचा आदेश डावलून घेताना दिसत आहेत. या मावा विक्रेत्यांनी चढ्या दराने मावा विक्रीस सुरवात केली आहे. २० च्या पुडीची किंमत ५० रुपयांवर गेली आहे. तर काही ठिकाणी तर १०० ला तीन या दराने विक्री सुरू आहे. 

माव्याच्या दरापेक्षाही मावा ग्राहकांपर्यंत पोचवण्याच्या खास क्‍लुप्त्या लढवल्या आहेत. यामध्ये बंद दुकाने, विशिष्ट कट्टा, कोपऱ्यावरील दगडाखाली ठेवून त्यावर फारशी ठेवली जाणे, पार्किंग केलेल्या गाडीच्या डिग्गीमध्ये ठेवणे, असे प्रकार वापरून मावा पोचवण्याचे काम सुरू आहे. काही मावा विक्रेत्यांनी तर पिशवीमध्ये खाली मावा आणि वरती भाजी अशी शक्कल लढवली आहे.
शहरामध्ये शिवाजी पेठेतील उभ्या मारुती चौक परिसर, संभाजीनगर भाजी मंडई आणि कमानी परिसरात, खासबाग मैदान परिसर, मार्केट यार्डनजीक, कळंबा परिसर, पाचगाव, आपटेनगर नाका परिसर ते फुलेवाडी रिंगरोड, जुना बुधवार पेठ, पंचगंगा घाट परिसर, संध्यामठ, राजारामपुरी आईचा पुतळा परिसर, कसबा बावड्यात काही ठिकाणी मावा विक्रीची मुख्य ठिकाणे बनली आहेत. 

आधी पैसे, मग पुडी
सध्या मात्र या विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली असली तरीही जागेवर पोच मावा देण्याची विशेष सर्व्हिस चालू केली आहे. यासाठी मात्र मावाप्रेमींना वाट पाहावी लागते. सध्या याचे संपूर्ण व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत. आधी पैसे जमा झाल्याची खात्री झाल्यानंतरच मावा पोचवण्याची व्यवस्था केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com