यवतमाळच्या निमंत्रणावरून इचलकरंजीत यंत्रमागधारक संतप्त

Ichalkaranji Machine Owners Angry Over Yavatmal's Invitation Kolhapur Marathi News
Ichalkaranji Machine Owners Angry Over Yavatmal's Invitation Kolhapur Marathi News

इचलकरंजी : सध्या यंत्रमाग उद्योग कार्यरत असलेल्या केंद्रांना शासनाची मदतीची कोणतीही ठोस भूमिका नाही. त्यामुळे अनेक अडचणीतून यंत्रमाग उद्योग मार्गक्रमण करीत आहे. एकीकडे शासनाची ही भूमिका असताना यवतमाळमधील टेक्‍स्टाईल पार्कमध्ये उद्योग स्थापन करण्यास निमंत्रित करण्याच्या दुसऱ्या भूमिकेबद्दल यंत्रमाग उद्योगातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 
तीन- चार वर्षापासून यंत्रमाग उद्योग अडचणीतून जात आहे.

वर्षभरापूर्वी तर साधे माग भंगारात गेले. लॉकडाउनचा फटका यंत्रमागासह अन्य पूरक उद्योगांना बसला. यातून हा उद्योग आता सावरत आहे. पण त्यानंतरही सूतदर वाढीचे नवे संकट या उद्योगासमोर आहे. तुलनेने कापडाला मागणी व दर नसल्यामुळे यंत्रमाग उद्योग हैराण आहेत. किमान दिवाळीनंतर तरी या परिस्थीतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा यंत्रमाग उद्योजकांची आहे. 

मुळात या उद्योगाला सध्या शासनाकडून बुस्टर डोसची आवश्‍यकता आहे. पण शासनाच्या उदासीन भूमिकेचा या उद्योगाला फटका बसत आहे. वीज दरवाढीचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. व्याज अनुदान सवलतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. शासनाच्या विविध धोरणाचा फटका वेळोवेळी या उद्योगाला बसला आहे. शासन पातळीवर मदतीबाबत ठोस निर्णय होत नसल्यामुळे हा उद्योग सध्या कसाबसा तग धरून आहे. एकीकडे असे विदारक चित्र असताना दुसरीकडे मात्र या उद्योजकांना यवतमाळसारख्या ठिकाणी उद्योग सुरु करण्यास शासनाकडून निमंत्रीत केले जात आहे. 

प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्तांनी या संदर्भात सोलापूर, इचलकरंजी, विटा येथील यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये यवतमाळ येथील टेक्‍स्टाईल पार्कमध्ये उद्योग येण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या या भूमिकेबद्दल यंत्रमाग उद्योजकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इचलकरंजी, विटा, सोलापूर अशा वस्त्रोद्योग केंद्रातील यंत्रमागधारक अस्तित्वासाठी धडपडत आहेत. अशा परिस्थीतीत ही भूमिका चुकीची असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. 

यवतमाळ हा कापूस उत्पादन करणार परिसर आहे. या परिसरातच वस्त्रोद्योग निर्माण झाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या उद्योजकांना कोणत्याही खास सुविधा न देता निमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती आहे. एकूणच या धोरणाबद्दल यंत्रमाग उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

धोरण चुकीचे
सध्याचा अडचणीतून जात असलेला यंत्रमाग उद्योग सुरळीत करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. आणि दुसरीकडे नवीन ठिकाणी यंत्रमाग उद्योग वाढवण्याचे धोरण पूर्णतः चुकीचे आहे. 
-विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com