चंदगड तालुक्‍यातील पतपेढी फोडणाऱ्याकडून २० लाखाचे दागिने जप्त

Jewelery worth Rs 20 lakh seized from a burglar in Chandgad taluka
Jewelery worth Rs 20 lakh seized from a burglar in Chandgad taluka

कोल्हापूर,  ः कोवाड (ता. चंदगड) येथील पतसंस्थेचे लॉकर गॅस कटरने तोडून त्यातील सोन्याचे दागिने चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. या प्रकरणी तीन संशयित घरफोड्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचे 39 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी दिली. 
अटक केलेल्या संशयितांची नावे ः महेश ऊर्फ पिंटू सुबराव कोले (वय 37), सुनील ऊर्फ जान्या रामा तलवार (22, दोघे रा. कोवाड) आणि संतोष ऊर्फ राजू ज्ञानेश्‍वर सुतार (25, रा. चिंचणे, ता. चंदगड) अशी आहेत. 
कोवाड येथील अभय ग्रामीण पतसंस्थेत 12 सप्टेंबरला चोरी झाली होती. चोरट्यांनी संस्थेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर संस्थेचे लोखंडी लॉकर गॅस कटरने कापून त्यातील 75 तोळे सोन्याचे दागिने लांबविले होते. या संस्थेत अनेकांनी आर्थिक अडचणीसाठी सोने तारण ठेवले होते. अनेक सर्वसामान्यांच्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत व सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांच्या पुढाकारातून या प्रकरणाचा छडा लागला. 
घुले यांच्या पथकाला ही चोरी संशयित महेश ऊर्फ पिंटू कोले याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने साथीदार सुनील ऊर्फ जान्या तलवार, संतोष ऊर्फ राजू सुतार यांनी पतसंस्थेत चोरी केल्याची कबुली दिली. कोले याच्या घरातून पोलिसांनी सोन्याचे गंठण, चेन, अंगठ्या, नेकलेस, टॉप्स, कानवेल, मोहनमाळ असे 39 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. त्याची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे. त्यानंतर पोलिसांनी तलवार व सुतार या दोघांनाही अटक केली. 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com