पायाला भिंगरी बांधून दुर्गांची सफर करणारे दुर्गप्रेमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्रातील गडकोट इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. गडावरील वास्तू, तलाव, पाण्याच्या टाक्‍यांचे आकर्षण आजही कायम आहे. पायाला भिंगरी बांधून दुर्गांची सफर करणारे दुर्गप्रेमींचा येथे तुटवडा नाही.

महाराष्ट्रातील गडकोट इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. गडावरील वास्तू, तलाव, पाण्याच्या टाक्‍यांचे आकर्षण आजही कायम आहे. पायाला भिंगरी बांधून दुर्गांची सफर करणारे दुर्गप्रेमींचा येथे तुटवडा नाही. संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मोहिमांचे वेळापत्रकही ठरलेले असते. गडावर पाऊल ठेवल्यावर "छत्रपती शिवाजी महाराज की जय,' अशी घोषणा त्यांच्या तोंडातून आपसूक बाहेर पडते. गडाला भेट देऊन स्वच्छतेच्या उपक्रमाला ते हातभार लावतात. शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर गडकोटांची भ्रमंती करणाऱ्या संस्थांवर आधारीत ही मालिका... 

हे पण वाचा - Valentine Day Special : एकतर्फी प्रेमात पडलेल्याला  व्हॅलेंटाईन डे पडला महागात..

कोल्हापूर : गडकोट गिर्यारोहक संस्थेच्या कार्यकर्त्यांचे मोहिमांचे वेळापत्रक ठरलेले असते. नियोजित गडांच्या मोहिमेचा अभ्यास केल्यावरच त्यांच्या मोहिमेचा नारळ फुटतो. गडवाटांची माहिती घेतल्यानंतर आवश्‍यक साहित्य, शिधा त्यांच्या पाठीवरील सॅकमध्ये पॅक होते. वाटाड्याची गरज भासली, तर त्याचा विचारही केला जातो. गडावरील साफसफाईला प्राधान्य देणे, हे त्यांच्या मोहिमांचे वैशिष्ट्य ठरते. 

नितीन देवेकर संस्थेचे अध्यक्ष असले, तरी सर्व सदस्यांत एकोपा मजबूत आहे. सर्व जण एकदिलाने संस्थेसाठी काम करतात. पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेच्या आयोजनात त्यांचे सातत्य आहे. या मोहिमेकरिता संस्थेचे सर्व सदस्य आपली कामे बाजूला ठेवून एकत्र येतात. अन्य मोहिमांसाठी सहा-सात जण एकत्र येऊन नियोजन करतात. गडपायथ्याच्या गावांची माहिती घेऊन तेथील लोकांशी संपर्क साधणे, हे त्यांचे वैशिष्टय आहे. गडावर पोचल्यावर वास्तूंच्या साफसफाई ते प्राधान्याने करतात. गडावरील मंदिर अथवा पायथ्याच्या गावात त्यांचा ठिय्या असतो. 
फोटोग्राफीला त्यांच्या मोहिमेत महत्त्वाचे स्थान आहे. गडकोटांचा ठेवा भावी पिढीला कळावा, हा उद्देश त्यामागे आहे. राजगड, तोरणा, रायगड, लिंगाणा, साल्हेर, मुल्हेर, सालोटा, हरगड, मोरागड, धोडप, रवल्या, जवल्या, मार्केंड्या, सप्तशृंगी, अहिवंत, गोरखगड, मच्छिंद्रगड, अलंग, मदन, कुलंग, हरिहरगड, सिद्धगडाच्या मोहिमेतील आठवणींचा खजिना त्यांच्याकडे जमा झाला आहे. 

हे पण वाचा - Valentine Day Special ; सलाम तिच्या धाडसी निर्णयाला; कर्करोगग्रस्त प्रथमेशसोबत केला विवाह

""राजगड ते तोरणा ही अवघड मोहीम आमच्या स्मरणात कोरली आहे. सरसगड चढताना दोन सदस्य गडाच्या अवघड वळणावर अडकले होते. त्यांना वर चढणे व खाली उतरणे शक्‍य नव्हते. त्यांना दोर सोडून वर ओढून घेतले. हा अनुभव आमच्यासाठी रोमांचकारी ठरला,'' असे अध्यक्ष श्री. देवेकर सांगतात. 

गडकोट गिर्यारोहक संस्था (शनिवार पेठ) 
- अध्यक्ष - नितीन नारायण देवेकर 
- स्थापना - 29 सप्टेंबर 1994 
- सदस्य - गजानन गराडे, मोहन पाटील, राम माने, अभिजित फल्ले, अमोल शिर्के, विश्‍वजित पाटील, भरत नेजकर, विनायक कुंभार, सत्यजित जाधव, करण पाटील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: journey on port