हार्मोनियम, ढोलकी, मृदंग, टाळ, चिपळ्यांच्या आवाजात कबिरांच्या विचारांचा जपला धागा

संदीप खांडेकर 
Monday, 8 February 2021

कबीरपंथी भजनाला शेकडो वर्षांची परंपरा

दूधगाव, आष्ट्याचे वैशिष्ट्य, कबिरांच्या विचारांचा जपला धागा

कोल्हापूर  :  लोककला मानवी जीवनात उत्साहाचा रंग भरतात. लोककलेच्या उपासकांनी त्यांचे जतन तर केलेच, त्याचा वारसा पुढच्या पिढ्यांना सुपूर्द केला. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मनोरंजन व प्रबोधनातून लोककला परंपरा आजही टिकून आहे. शिवाजी विद्यापीठाने राजर्षी शाहू लोकविद्या व लोकसंस्कृती अभ्यास केंद्राच्या माध्यमातून त्यांचे संकलन सुरू केले आहे. केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची माहिती एकत्रित केली जात आहे. त्याचा वेध घेणारी मालिका आजपासून

हार्मोनियम, ढोलकी, मृदंग, टाळ, चिपळ्यांच्या आवाजात अभंगाचे स्वर विलीन होताच, मनशांतीचा अनुभव येतो. भजनातून अध्यात्माची महती सांगताना, जातीभेद, धर्मभेद व कर्मकांडावर हल्ला चढविला जातो. चक्री, सोंगी व रिंगण भजनाचे प्रकार असले तरी एकतारी भजन परंपरेतून पुढे आलेले कबीर पंथीय भजन वैशिष्ट्यपूर्ण आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा व दूधगावांत कबीर पंथीय भजनाची परंपरा शेकडो वर्षे जोपासली आहे. हिंदी अभंग भजनात गायिले जातात. कबिरांच्या विचारांचा धागा भजनातून आजही मांडला जातो. 

हेही वाचा- शिक्षक व विद्यार्थ्यांची धांदल उडणार:   दहा महिन्यांचा अभ्यासक्रम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान

कबीर १५ व्या शतकात होऊन गेले. धार्मिक थोतांडांवर टीका करताना त्यांची निर्भीडता प्रकट झाली. हिंदू-मुस्लिम समाजाच्या ऐक्‍याचे प्रतीक म्हणून त्यांची ओळख आहे. राम, कृष्ण व विठ्ठल यांच्यावर त्यांनी दोहे रचले. मानवता हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. अत्यंत परखडपणे विचार मांडणारे संत म्हणून त्यांची गणना होते. त्यांच्या विचारांचा वारसा भजनातून दूधगावातील कबीरपंथी भजनी मंडळ व आष्ट्यातील नवनाथ एकतारी भजनी मंडळाने जोपासला आहे. भजनाची सुरवात गण गाऊन होते. इशस्तवन व गुरुमहिमेचा गोडवा सांगून अभंगांचे गायन केले जाते. 

हेही वाचा- सावधान : मोबाईलवर तुम्हाला असा मेसेज येतो का ?

भजनाला बोली भाषेतील उच्चार वैशिष्ट्यांचा स्पर्श आहे. मानधनाची फारशी अपेक्षा न करता कबीरांच्या दोह्यांतून शरीरशास्त्राची माहिती सांगितली जाते. दूधगावातील अप्पा कोले, आदाप्पा कुदळे, नामदेव माळी, बाबू तबोरजी, रावसाहेब आडमुठे, कृष्णा आंबी, पांडुरंग घोडके, शिवाजी गवळी, मारुती गवळी, धोंडीराम सपकाळ, रामचंद्र साळुंखे, भूपाळ माळी, राजेंद्र कोले, अशोक माळी, तर आष्टातील विष्णू थोरात, नारायण घाडगे, भारती मस्के, अजय गस्ते, राहुल थोरात, निरंजन थोरात, राजाराम आडमुठे, संजय आडमुठे भजनाची परंपरा टिकवून आहेत. 

पिढ्यान्‌पिढ्या कबीरपंथी भजनाची परंपरा आमच्याकडे टिकून आहे. आजोबा-पणजोबांकडून  भजनाचा वारसा आमच्याकडे आला आहे. मराठी भाषिक आमच्या गावत मौखिक रुपात कबीरांची भजने जोपासली आहेत. 
- अविनाश कुदळे

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kabirpanthi bhajan information tradition news marathi kolhapur