'तरीही कन्हैयाकुमारची सभा मैदानातच होणारच' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष डॉ.कन्हैया कुमार यांच्या उद्या (ता.20) होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

कोल्हापूर : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष डॉ.कन्हैया कुमार यांच्या उद्या (ता.20) होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही ही सभा मैदानावरच होणारच असल्याचा दावा एआयएसएफचे राज्य सचिव प्रशांत आंबी यांनी आज सायंकाळी सांगितले. सभा होण्यासाठी परवानगीसाठी पुनर्रविचाराचेही अर्जही दाखल केले असल्याचेही आंबी यांनी स्पष्ट केले. 

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती दिन अभिवादन सभेच्या निमित्ताने कन्हैया कुमार येणार आहेत. यावेळी विद्यार्थी नेत्या डॉ.अमृता पाठक (जेएनयु दिल्ली) सुद्धा प्रमुख वक्‍त्या असणार आहेत. सायंकाळी सात वाजता दसरा चौकातील मैदानात ही सभा होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केल्याचे आंबी यांनी सांगितले. ऑल इंडिया युथ फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशन, धर्मनिरपेक्ष विद्यार्थी-युवक संघटना कोल्हापूर यांच्यावतीने सभेचे आयोजन केले आहे. 

हेही वाचा- इचलकरंजीत राडा ; मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले

पोलिसांनी परवानगी नाकराली

आंबी यांनी सांगितले, की कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात कन्हैयाकुमार यांची सभा होण्यासाठी आयोजकांकडून परवानगीचे पत्र पोलिसांना दिले होते. त्यांनी दसरा चौक हा महापालिकेचा असून त्यांच्याकडून परवानगी घ्या आम्ही केवळ स्पीकर परवाना देतो असे सांगितले होते. त्यानंतर आम्ही महापालिकेच्या इस्टेट विभागात रितसर पत्र देवून परवाना मागितला होता. त्यामध्ये कन्हैया कुमार यांच्यासह अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत, यासह अन्य आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवर असल्याचे स्पष्ट केले होते. तेंव्हा त्यांनी भाडे घेवून मैदानावरील सभेसाठी परवानगी दिली. त्याची पावतीही आमच्याकडे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला असता त्यांनी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र उद्या (ता.20) सभा असताना आज दुपारी पोलिसांनी ही परवानगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल म्हणून परवानगी नाकारली आहे. 

हेही वाचा- श्वेता आणि बाळाच्या मृत्यूने नातेवाईकांसह ग्रामस्थांचा आक्रोश;  न्यायासाठी गाव गोळा

पुनर्रविचार करण्यासाठी अर्ज 

बंदिस्त हॉल मध्ये सभा घेण्यास कोणतीही हरकत नसल्याचे पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच जिल्हादंडाधिकारी यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत सामाजिक,राजकीय, धार्मिक, क्रिडा तसेच इतर मेळावे यांना प्रतिबंधत केल्याचेही कारणही पोलिसांनी दिले आहे. पुनर्रविचार करण्यासाठी आम्ही अर्ज केले आहेत. सध्या शाहूस्मारक भवन, केशवराव भोसले नाट्यगृहात सभा घेणे अशक्‍य आहे. तेथे यापूर्वीच इतर कार्यक्रमांचे बुकींग झाले आहे. तसेच यापूर्वी कन्हैयाकुमार यांचा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात झाला होता. तेंव्हा झालेल्या प्रचंड गर्दीमुळे यावेळी हा कार्यक्रम मैदानात ठेवला आहे. त्यामुळे कोणत्याही परस्थितीत उद्याची कन्हैया कुमार यांची सभा दसरा चौकातच होणार आहे.  

संपादन - अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanhaiya Kumar meeting in kolhapur marathi news