
चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात कोल्हापूरच्या खंडोबा तालीम मंडळाने स्थानिक शिवरत्न क्लबला एका गोलने नमवून अजिंक्यपदासह रोख 16 हजार रुपये व छत्रपती चषक पटकाविला.
गडहिंग्लज : चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात कोल्हापूरच्या खंडोबा तालीम मंडळाने स्थानिक शिवरत्न क्लबला एका गोलने नमवून अजिंक्यपदासह रोख 16 हजार रुपये व छत्रपती चषक पटकाविला. उत्कृष्ठ आघाडीपटूचा मानकरी ठरलेला संकेत साळोखेचा गोल निर्णायक ठरला. खंडोबाचाच गोलरक्षक आकाश मेस्त्री स्पर्धावीर ठरला. कट्टा ग्रुप तृतीय तर काळतभैरव क्लबला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर गेले दोन दिवस या नाईन साईड फुटबॉंल स्पर्धा सुरु होत्या.
अंतिम सामन्यात सुरवातीपासून खंडोबाने लहान पासेसचा वापर करत वर्चस्व मिळविले. परंतु, बचावात्मक खेळणाऱ्या शिवरत्नने मध्यतंरापर्यंत त्यांची डाळ शिजू दिली नाही. सामना संपण्यास 7 मिनिटे शिल्लक असताना संकेतने महत्वपुर्ण गोलची नोंद केली. दरम्यान, उपात्यंफेरीत अनपेक्षितपणे खंडोबा तालीमने काळभैरव क्लबचा ट्रायब्रेकरवर 3-2 असा पराभव केला. पुवार्धात दोन गोलने पिछाडीवर असलेल्या खंडोबाने उतरार्धात जिगरबाज खेळ करुन बरोबरी साधली होती. शिवरत्नला नवख्या कट्टा ग्रुपशी विजयासाठी झूंजावे लागले.
अंतिम सामन्यानंतर विजेत्या, उपविजेत्या संघाना अँड. व्ही. एस. पाटील, विजय शिवबुगडे, अजिंक्य मोहिते, संतोष चौगुले, आण्णाप्पा गाडवी, एम. एस. बोजगर. आदित्य मोहिते,चंद्रकांत आसबे, गणेश तोरसे, राहुल नागावकर यांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली. उत्कृष्ठ गोलरक्षक म्हणून राजशिवा कलगुटगी, मध्यरक्षक अक्षय होडगे, बचावपटू सौरभ हुलसार यांचाही गौरव करण्यात आला. संयोजक संग्राम आसबे यांनी आभार मानले.
संपादन - सचिन चराटी
kolhapur