केएमटीची चाके पुन्हा रूतली 

The KMT wheels are re-bolted
The KMT wheels are re-bolted

कोल्हापूर : महिन्याभरात पुर्वपदावर आलेल्या केएमटीचा पाय "लॉक डाऊन'मुळे पुरता खाली रूतला आहे. चाकेच थांबल्याने दररोज किमान आठ लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. गेल्या सतरा दिवसांत सुमारे दीड कोटी इतके उत्पन्न बुडाले आहे. यातून पुन्हा उठून गाडी रूळावर आणण्याचे मोठे आव्हान व्यवस्थापनासमोर असून "लॉक डाऊन' उठल्यानंतर टप्याटप्याने केएमटीची सेवा सुरू होणार आहे. 

"कोरोना'च्या रूपाने केएमटीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अतिरिक्त व्यवस्थापकांनी शिस्त लावून दैनंदिन उत्पन्नात 30 ते 35 हजारांची वाढ केली होती. जानेवारीचा पगारही वेळेत झाला होता. केएमटीच्या वाट्याला "अच्छे दिन' आले असताना "कोरोना'मुळे ही चाके थांबली आणि अर्थकारण पुन्हा एकदा बिघडून गेले. केएमटीच्या पंपावरून महापालिकेच्या वाहनांना इंधन दिले जाते. त्याचे 25 लाख रूपये मिळाले आहेत. महापालिका दर महिन्याला 80 लाख रूपये देते, त्यावर अवंलबून राहावे लागणार आहे. चालक वाहक, कर्मचाऱ्यांचा पगार ही अत्यावश्‍यक बाब, वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांचा शंभर टक्के पगार द्यावा लागतो. तो या महिन्यात कसाबसा होईल. पुढील महिन्यात तो ही होईल की नाही याची हमी देता येत नाही. 

केएमटीच्या दररोज 101 गाड्या रस्त्यावर असतात. लॉक डाऊननंतर एकही रस्त्यावर आलेली नाही. दैनंदिन उत्पन्न आठ ते सव्वा आठ लाख रूपये मिळाले तरच केएमटीचे आर्थिक गणित चालते. डिझेल खरेदी, गाड्यांची देखभाल दुरूस्ती, सरकारी देणी, पगाराची रक्कम अशी गणिते उत्पन्नावर आधारित असतात. गाड्यांसाठी किमान दिवसाआड डिझेलचा टॅंकर मागवावा लागतो. 

गाड्या प्रतिसाद पाहूनच रस्त्यावर... 
"लॉक डाऊन'मधून बाहेर पडल्यानंतर 101 गाड्या एकावेळी रस्त्यावर येऊ शकत नाहीत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून किमान एकावेळी वीस ते पंचवीस गाड्या रस्त्यावर आणण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. शंभर टक्के गाड्या बंद राहण्यापेक्षा किमान काही गाड्या रस्त्यावर आणण्याचा विचार आहे. शाळा महाविद्यालयांना दोन महिने सुट्टी असल्याने विद्यार्थी सवलतीच्या उत्पन्नाचाही तोटा होणार आहे. ज्या मार्गावर प्रवाश्‍यांची संख्या अधिक आहे तेथे पहिल्या टप्यात तेथे गाड्या सुरू करण्याचा विचार आहे. 

लॉक डाऊनच्या काळात गाडयांच्या देखभाल दुरूस्तीवर भर दिला आहे. शासनाच्या धोरणानुसार गाड्या बाहेर काढल्या जातील. एकावेळी सर्व गाड्या बाहेर न काढता टप्याटप्याने त्या रस्त्यावर येतील. उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नांना सावकाश का असेना पण निश्‍चितपणे सुरवात होईल. 
- सुभाष देसाई, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com